...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 08:12 IST2026-01-07T08:11:49+5:302026-01-07T08:12:33+5:30
Trump Impeachment News: डोनाल्ड ट्रम्प यांना महाभियोगाची भीती; अमेरिकन निवडणुकीपूर्वी खळबळजनक विधान

...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यावधी निवडणुकांच्या तोंडावर एक खळबळजनक विधान केले आहे. "जर या निवडणुकीत आमच्या पक्षाचा पराभव झाला, तर विरोधी पक्ष डेमोक्रॅट्स माझ्यावर महाभियोग चालवून मला राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्याचा प्रयत्न करतील," अशी भीती ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.
ग्रीनलँड विलीनीकरण आणि व्हेनेझुएला प्रकरणावरून आधीच विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या ट्रम्प यांनी आता आपल्या समर्थकांना भावनिक साद घातली आहे. एका प्रचारसभेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, विरोधकांचा मुख्य अजेंडा देशाचा विकास नसून केवळ मला सत्तेतून बाहेर काढणे हा आहे. त्यांना (डेमोक्रॅट्सना) केवळ बदला घ्यायचा आहे. जर त्यांना बहुमत मिळाले, तर ते पहिल्याच दिवशी माझ्यावर खोटे आरोप लावून महाभियोगाची प्रक्रिया सुरू करतील," असे ट्रम्प यांनी नमूद केले.
"आमचे सरकार यशस्वी झाले आहे, पण लोक म्हणतात की अध्यक्ष झाल्यानंतर मध्यावधी निवडणुका हरतात. तुम्ही सर्वजण या खेळात माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहात. जनतेच्या मनात काय चालले आहे ते मला समजत नाही.", असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेच्या संसदेत जर विरोधकांचे वर्चस्व वाढले, तर राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयांवर अंकुश लावणे आणि त्यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू करणे सोपे होते. ट्रम्प यांच्या काही अलीकडील वादग्रस्त जागतिक निर्णयामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ही निवडणूक ट्रम्प यांच्यासाठी 'अस्तित्वाची लढाई' बनली आहे.
जागतिक राजकारणावर परिणाम
ट्रम्प यांच्या या विधानामुळे अमेरिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जर खरोखरच अमेरिकेत सत्तापालट झाला किंवा महाभियोगाची स्थिती निर्माण झाली, तर त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवरही होऊ शकतो.