"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 15:40 IST2025-10-26T15:37:51+5:302025-10-26T15:40:44+5:30
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत थायलंड-कंबोडिया युद्धविरामावर सही!

"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Donald Trump: थायलंड आणि कंबोडिया या दोन आग्नेय आशियाई देशांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत युद्धविराम करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांच्या प्रशासनाने फक्त आठ महिन्यांत आठ युद्धे समाप्त केली असून, लवकरच पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षही सोडवला जाईल.
ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धविराम करार
थायलंड आणि कंबोडियामधील सीमावाद व लष्करी संघर्ष थांबवण्यासाठी दोन्ही देशांच्या नेत्यांनी ‘विस्तारित युद्धविराम करार’ केला. ट्रम्प यांच्या उपस्थितीत झालेल्या या कराराला आशियातील स्थैर्याकडे मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. थायलंडच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांचे शांततेसाठी व्यक्तिगत योगदानाबद्दल आभार मानले, तसेच युद्धविराम आणि युद्धकैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे सांगितले.
लवकरच पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षही सोडवेन- ट्रम्प
या कार्यक्रमात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आता फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष बाकी आहे. मी दोन्ही देशांच्या नेत्यांना ओळखतो, ते चांगले लोक आहेत. हा वादही मी लवकर सोडवेन. हा माझा छंद नाही म्हणू शकत, पण खरं सांगायचं तर मी यात निपुण आहे. मी दर महिन्याला एक युद्ध थांबवले. संयुक्त राष्ट्रांनी हे करायला हवे, पण ते काही करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
डोनाल्ड ट्रम्प आशिया दौऱ्यावर
ट्रम्प सध्या पाच दिवसांच्या आशिया दौऱ्यावर असून त्यांनी मलेशियामधून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. ते क्वालालंपूरमध्ये सुरू होणाऱ्या आसियान (ASEAN) परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जपानमध्ये नव्या पंतप्रधान साना ताकाइची यांची भेट घेतील, त्यानंतर दक्षिण कोरियातील बुसान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापार शिखर परिषदेत सहभागी होतील आणि शेवटी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील.