Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याची नाराजी आता उघडपणे समोर येत आहे. ट्रम्प यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोरे यांना पाठवलेल्या एका पत्रात नोबेल पुरस्कार न मिळाल्यामुळे शांती ही आपली प्राथमिकता राहिलेली नाही, असे सूचक विधान केल्याचा दावा करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॉर्वेच्या पंतप्रधानांनी सोमवार(19 जानेवारी 2026) रोजी स्थानिक माध्यमांना या पत्राची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, 18 जानेवारी 2026 रोजी ट्रम्प यांचा संदेश मिळाला. हा संदेश फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांनी याआधी पाठवलेल्या एका संयुक्त निवेदनाच्या प्रत्युत्तरात आला होता. त्या निवेदनात फिनलंड, नॉर्वे आणि इतर देशांवर लावण्यात आलेल्या अमेरिकन टॅरिफ्सला विरोध व्यक्त करण्यात आला होता.
ग्रीनलँड अमेरिकेला द्या, ट्रम्प यांचा आग्रह
पत्रात ट्रम्प यांनी नॉर्वेला असेही सुचवले की, डेनमार्कला सांगून ग्रीनलँड अमेरिकेकडे सोपवावा. तुमच्या देशाने आठ युद्धे थांबवण्यासाठी मला नोबेल शांतता पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता माझ्यावर शांतीचा विचार करण्याची बाध्यता नाही. शांती महत्त्वाचीच राहील, पण आता मी अमेरिकेसाठी काय योग्य आहे, याचाही विचार करू शकतो, असे सूचक विधान ट्रम्प यांनी केले.
डेनमार्क ग्रीनलँडचे संरक्षण करू शकत नाही
ट्रम्प यांनी दावा केला की, डेनमार्क रशिया किंवा चीनकडून ग्रीनलँडचे संरक्षण करू शकत नाही. डेनमार्ककडे ग्रीनलँडच्या मालकीचा कोणताही लिखित दस्तऐवज नाही. शेकडो वर्षांपूर्वी डेन्मार्कचे एक जहाज तिथे उतरले, म्हणून मालकी कशी ठरते? आमची जहाजेही तिथे उतरली आहेत, असा दावाही त्यांनी केल्याचा यात उल्लेख आहे.
नोबेलचा निर्णय सरकारचा नाही
विशेष म्हणजे, नोबेल शांतता पुरस्काराचा निर्णय नॉर्वे सरकार घेत नाही, तर ओस्लोस्थित स्वतंत्र नोबेल समिती घेते. तरीही ट्रम्प यांची नाराजी थेट नॉर्वेवर व्यक्त झाल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
स्वतःला नोबेलसाठी सर्वोत्तम उमेदवार मानण्याचा दावा
ट्रम्प यांनी याआधीही अनेकदा युद्ध थांबवण्यात आपण निर्णायक भूमिका बजावली असल्याचा दावा केला असून, स्वतःला नोबेल शांतता पुरस्कारासाठी योग्य उमेदवार म्हटले आहे. मागील वर्षीचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना देण्यात आला होता. विशेष म्हणजे, अलीकडेच मचाडो यांनी अमेरिकेतील व्हाईट हाउसमध्ये जाऊन आपला पुरस्कार ट्रम्प यांना अर्पण केला.
Web Summary : Trump, upset about not receiving the Nobel Peace Prize, reportedly demanded Greenland from Norway's Prime Minister, suggesting his focus has shifted from peace to American interests. He questioned Denmark's claim to Greenland, citing insufficient protection against Russia or China.
Web Summary : नोबेल शांति पुरस्कार न मिलने से नाराज़ ट्रंप ने कथित तौर पर नॉर्वे के प्रधानमंत्री से ग्रीनलैंड की मांग की, यह सुझाव देते हुए कि उनका ध्यान शांति से हटकर अमेरिकी हितों पर चला गया है। उन्होंने रूस या चीन के खिलाफ अपर्याप्त सुरक्षा का हवाला देते हुए ग्रीनलैंड पर डेनमार्क के दावे पर सवाल उठाया।