‘ट्रम्प यांना जावं लागेल…’, महिलेच्या मृत्यूवरून अमेरिकेत प्रक्षोभ, आंदोलक रस्त्यावर, कोण होती ती?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 18:10 IST2026-01-08T18:09:47+5:302026-01-08T18:10:22+5:30

United State News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आक्रमक राजकीय आणि आर्थिक धोरणांमुळे संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. मात्र आपल्याच देशात डोनाल्ड ट्रम्प यांना नवनव्या संकटांचा सामना करावा लागत आहे. एका महिलेच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणावरून सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मिनेसोटा राज्यात आंदोलन भडकलं आहे.

'Donald Trump has to go...', Outrage in America over woman's death, who was she? | ‘ट्रम्प यांना जावं लागेल…’, महिलेच्या मृत्यूवरून अमेरिकेत प्रक्षोभ, आंदोलक रस्त्यावर, कोण होती ती?  

‘ट्रम्प यांना जावं लागेल…’, महिलेच्या मृत्यूवरून अमेरिकेत प्रक्षोभ, आंदोलक रस्त्यावर, कोण होती ती?  

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आक्रमक राजकीय आणि आर्थिक धोरणांमुळे संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. मात्र आपल्याच देशात डोनाल्ड ट्रम्प यांना नवनव्या संकटांचा सामना करावा लागत आहे. एका महिलेच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणावरून सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मिनेसोटा राज्यात आंदोलन भडकलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना जावं लागेल, आयसीई आमच्या राज्यातून बाहेर जा, यासारख्या घोषणा लिहिलेले फलक घेऊन हजारो लोक रस्त्यांवर उतरले आहेत. तसेच आयसीईला राज्यांमधून बाहेर काढण्याची मागणी करण्यात येत आहे.  
एका आयसीई अधिकाऱ्याने बुधवारी मिनेसोटा राज्यातील मिनियापोलीस शहरामध्ये एका महिलेची गोळ्या झाडून हत्या केली होती. तेव्हापासून राज्यात असंतोषाचा भडका उडालेला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सक्त इमिग्रेशन धोरणादरम्यान, या अमेरिकन महिलेची हत्या झाली आहे.

रेनी निकोल गुड ही ३७ वर्षीय महिला कारमध्ये असताना सकाळी १०.३० वाजता पोर्टलँड एव्हेन्यूच्या चौकात तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आणि होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी या महिलेच्या मृत्यूसाठी या महिलेलाच दोषी ठरवले आहे. सदर महिला तिथे उपस्थित असलेल्या आयसीई अधिकाऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करून त्यांना चिथावणी देत होती, असे क्रिस्टी नोएम हिने सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन मोहिमेचा प्रमुख चेहरा मानल्या जाणाऱ्या नोएम यांनी सांगितले की, जेव्हा अधिकाऱ्यांनी रेनी गुड हिला कारमधून बाहेर पडण्यास सांगितले तेव्हा तिने ऐकलं नाही. तसेच तिने तिच्याकडे असलेल्या कारचा वापर एका हत्यारासारखा करत अधिकाऱ्यांना धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या अधिकाऱ्याने स्वसंरक्षणासाठी तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या.

दरम्यान, रेनी गुड हिच्या मृत्युविरोधात मिनोसोटा राज्यात संताप उफाळून आला आहे. रेनी गुड हिने सोशल मीडियावर तिची ओळख एक कवयित्री, लेखिका, पत्नी आणि आई, अशी करून दिलेली आहे. तसेच ती मुळची कोलोराडो येथील होती. मात्र सध्या ती मिनेसोटा येथे राहायला आली होती.  

Web Title: 'Donald Trump has to go...', Outrage in America over woman's death, who was she?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.