अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 07:51 IST2026-01-07T07:51:14+5:302026-01-07T07:51:38+5:30
Donald Trump Greenland News: जगाच्या क्षितीजावर जन्माला आलेला नवा हुकुमशहा असे ज्याचे वर्णन केले गेले ते डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात खरोखरच हुकूमशहा सारखे वागू लागले आहेत.

अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
चीनला विस्तारवादी म्हणता म्हणता अमेरिकाच विस्तारवादी राक्षसासारखी वागू लागली आहे. जगाच्या क्षितीजावर जन्माला आलेला नवा हुकुमशहा असे ज्याचे वर्णन केले गेले ते डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात खरोखरच हुकूमशहा सारखे वागू लागले आहेत. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचे अपहरण करून अमेरिकेत आणल्यानंतर आता त्यांनी ग्रीनलँडवर वाईट नजर टाकली आहे.
"ग्रीनलँडचे अमेरिकेत विलीनीकरण करणे ही आमची राष्ट्रीय सुरक्षा प्राथमिकता आहे," असे अधिकृत विधान व्हाईट हाऊसने सोमवारी केले. विशेष म्हणजे, यासाठी लष्करी बळाचा वापर करणे हा देखील एक पर्याय असल्याचे अमेरिकेने सूचित केले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी सांगितले की, आर्क्टिक क्षेत्रात रशिया आणि चीनसारख्या प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यासाठी ग्रीनलँडवर ताबा मिळवणे आवश्यक आहे. "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ग्रीनलँडसाठी विविध पर्यायांवर विचार करत आहेत. कमांडर-इन-चीफ म्हणून त्यांच्याकडे लष्करी पर्याय नेहमीच उपलब्ध असतो," असे लेव्हिट यांनी स्पष्ट केले.
नाटो (NATO) आणि युरोपीय देशांचा कडाडून विरोध
अमेरिकेच्या या भूमिकेमुळे जागतिक राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा स्वायत्त भाग असल्याने, डेन्मार्कसह संपूर्ण युरोपीय महासंघ आणि नाटोने या विधानाचा निषेध केला आहे. "एका मित्रराष्ट्राच्या भूभागावर लष्करी कारवाईची भाषा करणे हे जागतिक स्थिरतेला आणि नाटोच्या ऐक्याला सुरुंग लावण्यासारखे आहे," अशी प्रतिक्रिया युरोपीय नेत्यांकडून उमटत आहे.
अमेरिकेतही विरोध...
केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर अमेरिकेतील 'डेमोक्रॅट्स' आणि 'रिपब्लिकन' या दोन्ही पक्षांच्या खासदारांनी ट्रम्प यांच्या या भूमिकेवर चिंता व्यक्त केली आहे. मित्रराष्ट्रांना धमकावल्यामुळे अमेरिकेचे जागतिक स्थान कमकुवत होईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
ग्रीनलँड का हवेय...
ग्रीनलँडच्या वायव्येस अमेरिकेचा सर्वात उत्तरेकडील लष्करी तळ आहे. येथून अमेरिका बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची पूर्वसूचना मिळवू शकते आणि उपग्रहांच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकते. आर्क्टिक क्षेत्रात रशिया आणि चीन आपली लष्करी उपस्थिती वाढवत आहेत. रशियाने आर्क्टिकमध्ये अनेक जुने तळ पुन्हा सक्रिय केले आहेत. अमेरिकेला भीती आहे की जर ग्रीनलँडवर त्यांचे नियंत्रण नसेल, तर हे विरोधक अमेरिकेच्या दारात येऊन बसतील. रशियाकडून अमेरिकेवर डागलेली क्षेपणास्त्रे ही ग्रीनलँडच्या वरून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तेथे क्षेपणास्त्र रोधक प्रणाली बसवणे ट्रम्प प्रशासनासाठी फायद्याचे आहे. परंतू, चीन, रशिया हे केवळ निमित्त आहेत. संगणक, स्मार्टफोन, बॅटरी आणि प्रगत लष्करी उपकरणांसाठी लागणाऱ्या खनिजांचा येथे मोठा साठा आहे. सध्या चीनचे यावर वर्चस्व आहे, जे अमेरिका मोडीत काढू इच्छिते. हवामान बदलामुळे बर्फ वितळत असल्याने 'नॉर्थवेस्ट पॅसेज' आणि 'ट्रान्सपोलर सी रूट' हे नवीन व्यापारी मार्ग खुले होत आहेत. यामुळे आशिया आणि युरोपमधील प्रवासाचा वेळ ४०% वाचू शकतो. ग्रीनलँडच्या समुद्राखाली अब्जावधी बॅरल तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे असल्याचा अंदाज आहे.