अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धासंदर्भात भाष्य केले आहे. या चार दिवसांच्या युद्धानंतर युद्धविरामासाठी सहमती दर्शवल्याबद्दल ट्रम्प यांनी दोन्ही देशांचे कौतुक केले. "या आक्रमकतेमुळे लाखो लोकांचा बळी गेला असता. आता शांतता प्रस्थापित झाल्यानंतर, आपण दोन्ही देशांशी व्यापार आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रितपणे काम करू," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी संध्याकाळी एक सोशल मीडिया पोस्ट करत, अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शविली, असे म्हटले होते. मात्र, पाकिस्तानसोबत थेट चर्चेद्वारे युद्धविरामावर सहमती झाल्याचे भारताने म्हटले होते. तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या मध्यस्थीसंदर्भात भाष्य केले होते. यानंतर आज पुन्हा एकदा ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसंदर्भात ट्विट केले आहे.
आपल्या ताज्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, "भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि दृढ नेतृत्वाचा मला अत्यंत अभिमान वाटतो. कारण सध्याची आक्रमकता थांबवण्याची वेळ आली आहे, हे समजण्याचे शक्ती आणि शहाणपण त्यांच्यात आले. जर हा संघर्ष सुरूच राहिला असता, तर मोठ्या प्रमाणावर लोक मृत्यूमुखी पडले असते आणि मोठा विनाश झाला असता. लाखो चांगल्या आणि निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले असते. मला अभिमान आहे की अमेरिका आपल्याला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली. मी या दोन्ही देशांसोबतचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे."
काश्मीरवरही काढू शकतो तोडगा - काश्मीर मुद्द्यावर दोन्ही देशांच्या नेत्यांना उद्देशून आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, "मी तुम्हा दोघांसोबतही काश्मीर मुद्द्यावर बोलण्यासही तयार आहे. 'काश्मीरसंदर्भात हजार वर्षांनंतर'ही काही तोडगा निघू शकतो यावर आपण एकत्रितपणे विचार करू शकतो. देव भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला चांगले काम करण्याचा आशीर्वाद देवो."