दोस्तीत कुस्ती; ट्रम्प आणि पुतिन यांची मैत्री होण्यापूर्वीच तुटली, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:50 IST2025-05-28T17:49:59+5:302025-05-28T17:50:29+5:30

या दोन्ही देशांमधील तणावाचे जागतिक परिणाम पाहायला मिळू शकतात.

Donald Trump and Vladimir Putin's friendship broke even before it was established, why? | दोस्तीत कुस्ती; ट्रम्प आणि पुतिन यांची मैत्री होण्यापूर्वीच तुटली, कारण काय..?

दोस्तीत कुस्ती; ट्रम्प आणि पुतिन यांची मैत्री होण्यापूर्वीच तुटली, कारण काय..?


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. पण, गेल्या काही काळापासून या दोन्ही नेत्यांमधील वाद कमी होत असल्याचे जाणवत होते. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये असलेला राजकीय संघर्ष आता सार्वजनिक धमक्यांच्या पातळीवर पोहोचला आहे. ट्रम्प यांनी केलेल्या अलीकडील विधानांवरुन दोस्तीत कुस्ती झाल्याचे स्पष्टपणे जाणवते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशियाला थेट इशारा दिला की, पुतिन आगीशी खेळत आहेत आणि त्याचा परिणाम खूप वाईट असू शकतो. हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा ट्रम्प प्रशासनाने रशियावर अधिक कठोर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. यामध्ये संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रांना लक्ष्य करण्यात आले आहे.

तिसऱ्या महायुद्धापेक्षा वाईट...रशियाचे प्रत्युत्तर
रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष आणि माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी ट्रम्पच्या धमकीला अतिशय कठोर स्वरात उत्तर दिले. ते म्हणाले की, जर अमेरिकेला असे वाटत असेल की, यापेक्षा वाईट काहीतरी घडू शकते, तर त्यांनी तिसऱ्या महायुद्धालाही तयार राहावे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, रशिया आणि अमेरिकेतील संबंध सुधारण्यापूर्वीच बिघडले आहेत. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर रशियादेखील मागे हटण्याच्या मनःस्थितीत नाही. या दोन्ही महासत्त्यांच्या तणावाचे जागतिक परिणामही पाहायला मिळू शकतात.

पुतिन यांच्याशी भेटीसाठी उत्सुक होते ट्रम्प
रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून पुतिन यांना वैयक्तिकरित्या भेटण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी किमान तीन वेळा भेटीसाठी मॉस्कोला प्रस्ताव पाठवला, परंतु प्रत्येक वेळी एकतर प्रतिसाद मिळाला नाही किंवा परिस्थितीचा हवाला देत रशियाने बैठक पुढे ढकलली. ट्रम्प यांना आशा होती की, पुतिन लवकरच त्यांच्यासोबत बसुन धोरणात्मक चर्चा करतील, पण आता तसे होताना दिसत नाही.

अमेरिकेचा शांततेच्या चर्चेतून माघार घेणार
ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अनेक वेळा सांगितले होते की मी सत्तेत येताच, मी 24 तासांत रशिया-युक्रेन युद्ध थांबवेन. पण आता ते सत्तेत येऊन चार महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी परिस्थिती जैसे थे आहे. यामुळेच ट्रम्प शांतता चर्चेतून माघार घेण्याचा विचारही करत आहेत. या घटनांमुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की, अमेरिका आणि रशिया धोरणात्मकदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात आहेत. 

Web Title: Donald Trump and Vladimir Putin's friendship broke even before it was established, why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.