"PM मोदींनी शब्द दिला, तरी खरेदी सुरू"; रशियाकडून तेल आयात थांबवण्याची धमकी, ट्रम्प यांचा टॅरिफचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 11:06 IST2025-10-20T09:21:08+5:302025-10-20T11:06:42+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळीच्या दिवशी भारतावर टॅरिफबाबत मोठी टिप्पणी केली आहे.

"PM मोदींनी शब्द दिला, तरी खरेदी सुरू"; रशियाकडून तेल आयात थांबवण्याची धमकी, ट्रम्प यांचा टॅरिफचा इशारा
Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रशियाकडून तेलाची खरेदी सुरू ठेवल्यास भारतावर जबरदस्त टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याची पुन्हा एकदा धमकी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन तेलाची आयात थांबवण्याचे त्यांना वैयक्तिक आश्वासन दिले होते, असा दावाही त्यांनी केला. युक्रेन युद्धात मॉस्कोची मदत होत असल्याचे लक्षात घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला.
'एअर फोर्स वन' मध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रंप म्हणाले की, "पंतप्रधान मोदींनी मला सांगितले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. पण जर त्यांनी असे करणे सुरू ठेवले, तर त्यांना जबरदस्त टॅरिफ भरावा लागेल."
यापूर्वी, व्हाईट हाऊसमधील त्यांच्या घोषणेनंतर, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रंप यांचा हा दावा फेटाळून लावला होता. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांना अलीकडील काळात ट्रंप आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या कोणत्याही संभाषणाची माहिती नाही. भारत आणि अमेरिकेमध्ये ऊर्जा सहकार्यावर चर्चा सुरू आहे, पण रशियन तेल खरेदी थांबवण्यास नवी दिल्ली सहमत झाल्याच्या ट्रंप यांच्या दाव्याला त्यांनी दुजोरा दिला नाही.
भारताने हा दावा फेटाळल्यानंतरही ट्रंप यांनी आपले म्हणणे कायम ठेवले. "जर त्यांना तसे म्हणायचे असेल, तर ते मोठ्या टॅरिफचे पेमेंट करत राहतील आणि त्यांना तसे करायचे नाही. भारत सुमारे एक-तृतीयांश तेल रशियाकडून घेतो आणि आमच्या प्रशासनाला ही खरेदी म्हणजे मॉस्कोला युक्रेनमधील युद्धासाठी आर्थिक मदत करणे वाटते, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
ट्रंप यांनी जेव्हा भारताला आधीच अमेरिकेच्या मोठ्या आयात शुल्काचा सामना करावा लागत असतानाच हा इशारा दिला. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने कापड आणि औषधांसह अनेक प्रमुख भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. दुसरीकडे, ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे आणि तो भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे एक-तृतीयांश वाटा पुरवतो. सवलतीच्या दरात मिळत असल्यामुळे भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी ही खरेदी आवश्यक असल्याचे सांगून त्याचे समर्थन केले आहे. सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की, रशियाकडून होणारी तेलाची आयात ही राष्ट्रीय हितावर आधारित आहे, राजकीय स्वार्थातून नव्हे, आणि भारत अनेक जागतिक स्रोतांकडून तेल खरेदी करत आहे.