डोनाल्ड ट्रम्प काही केल्या ऐकेना; आता पुन्हा म्हणाले- "मीच भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 07:56 IST2026-02-06T07:55:49+5:302026-02-06T07:56:40+5:30
Donald Trump India Pakistan War Ceasefire: यावेळी तर ट्रम्प यांनी एकाच दिवसात दोनदा हा दावा केला आहे

डोनाल्ड ट्रम्प काही केल्या ऐकेना; आता पुन्हा म्हणाले- "मीच भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं..."
Donald Trump India Pakistan War Ceasefire: भारत आणि अमेरिका यांच्यात आर्थिक स्तरावर काही काळ तणावाची स्थिती होती. या काळात दोन्ही देशांमधील राजकीय संबंधही काहीसे बिघडले होते. पण दोन दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिका यांच्यात एक व्यापार करार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधरण्यास सुरुवात झाली. पण तशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा केला. एकाच दिवसात चक्क दोन वेळा त्यांनी या दावयाचा पुनरुच्चार केला. याआधी ट्रम्प यांनी जेव्हा जेव्हा असा दावा केला, त्यावेळी भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र सातत्याने याचा उल्लेख सुरुच ठेवला आहे.
एका दिवसात दोन वेळा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत सुमारे ९० पेक्षा जास्त वेळा दावा केला आहे की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष संपवला. तशातच आता एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले, "एका वर्षात मी आठ भयानक युद्धे संपवली आहेत. त्यात कंबोडिया आणि थायलंड, कोसोवो आणि सर्बिया, पाकिस्तान आणि भारत, इस्रायल आणि इराण आणि आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील युद्धांचा समावेश आहे." नंतर, ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध रोखल्याचा दावा पुन्हा केला.
भारताने प्रत्येक वेळी दावा फेटाळून लावला
गेल्या वर्षी १० मे रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर आधी युद्धबंदीची घोषणा केली. तेव्हापासून अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली, असे ते सतत दावा करताना दिसतात. अमेरिका आणि जगभरातील विविध व्यासपीठांवर ते सतत हा दावा वारंवार पुन्हा करतात. पण भारताने मात्र हे दावे प्रत्येकवेळी फेटाळून लावले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चेत मध्यस्थाची गरज नाही, असे भारताने अनेकदा ठणकावले आहे.
अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली
"अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. माझ्या पहिल्या कार्यकाळात, मी सैन्याची पूर्णपणे पुनर्बांधणी केली, ज्यामध्ये नवीन आणि अनेक अद्ययावर अण्वस्त्रांचा समावेश होता. मी अंतराळ दलाची स्थापना देखील केली आणि आता पुन्हा एकदा सैन्याची पुनर्रचना केली जात आहे. अमेरिका आता आयोवा, मिसूरी, अलाबामा सारख्या युद्धनौका उतरवत आहे, ज्या दुसऱ्या महायुद्धात समुद्रात असलेल्या युद्धनौकांपेक्षा १०० पट अधिक शक्तिशाली आहेत," असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धसज्जता दाखवून दिली.