"इराणकडे आता लढण्यासाठी ना नौसेना उरली आहे, ना वायूसेना! आम्ही त्यांचे कंबरडे मोडले आहे," अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला संबोधित करत आपली ताकद दाखवून दिली आहे. इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, विशेषतः 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'त अडकलेल्या देशांना एक प्रकारे सज्जड दमच भरला आहे.
दोनच पर्याय: लढा किंवा आमचे तेल घ्या!
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये ज्या देशांची जहाजे अडकली आहेत किंवा ज्यांना इराणच्या मार्गाने तेलाचा पुरवठा हवा आहे, त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी दोनच पर्याय ठेवले आहेत. ट्रम्प म्हणाले, "ज्यांना तेल हवे आहे त्यांनी एकतर स्वतः तिथे जाऊन इराणशी दोन हात करावेत किंवा सरळ अमेरिकेकडून तेल खरेदी करावे. आम्ही आमच्या जवानांचे प्राण इतरांच्या तेलासाठी धोक्यात घालणार नाही." हा इशारा प्रामुख्याने आशियाई आणि युरोपियन देशांसाठी असल्याचे मानले जात आहे.
बी-२ बॉम्बरचा इराणवर कहर
आपल्या भाषणात ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकेच्या शक्तीशाली बी-२ बॉम्बर विमानांनी इराणच्या अण्वस्त्र तळांवर भीषण हल्ले केले आहेत. "इराणचा मिसाइल प्रोग्राम आता इतिहास जमा झाला आहे. जर त्यांनी अण्वस्त्र बनवण्याचा प्रयत्न केला, तर ते इस्रायल आणि अमेरिकेसाठी मृत्यूचे वॉरंट ठरेल आणि आम्ही ते कधीही होऊ देणार नाही. माजी राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या चुका मी सुधारत आहे," असेही ट्रम्प यांनी अभिमानाने नमूद केले.
१३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू
या भीषण युद्धात आतापर्यंत अमेरिकेचे १३ सैनिक मारले गेल्याची अधिकृत कबुली ट्रम्प यांनी दिली आहे. मात्र, ही हानी इराणच्या तुलनेत नगण्य असल्याचे सांगत त्यांनी इराणमधील सत्तापरिवर्तनाचे संकेत दिले आहेत. "इराणला त्यांच्या कर्माची फळ मिळत आहेत. त्यांची अर्थव्यवस्था आणि लष्करी शक्ती आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे," असा दावा त्यांनी केला.
पुढील दोन आठवडे अत्यंत महत्त्वाचे
इराणला शेवटचा इशारा देताना ट्रम्प म्हणाले की, "जर येत्या दोन-तीन आठवड्यांत इराणने तडजोड केली नाही, तर आम्ही त्यांच्या देशातील सर्व वीज निर्मिती केंद्रांवर एकाच वेळी मोठा हल्ला करू. इराणला अंधारात लोटण्यास आम्हाला वेळ लागणार नाही." संघर्ष संपताच होर्मुझची सामुद्रधुनी आपोआप उघडेल, कारण इराणला पुन्हा उभे राहण्यासाठी तेल विकण्याशिवाय पर्याय नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Trump threatens Iran's power plants if no deal is made soon. He offers alternative oil sources, revealing attacks and losses. The US demands change.
Web Summary : ट्रम्प ने ईरान के साथ समझौते न होने पर बिजली संयंत्रों पर हमले की धमकी दी। उन्होंने वैकल्पिक तेल स्रोत पेश किए, हमले और नुकसान का खुलासा किया। अमेरिका बदलाव चाहता है।