Actor Dev Patel: रीलसोबतच रिअल लाईफ हिरो: चाकू हल्ला रोखण्यासाठी स्वतःचा जीव घातला धोक्यात, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 16:52 IST2022-08-04T16:50:58+5:302022-08-04T16:52:40+5:30
'स्लमडॉग मिलेनियर'सारख्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता देव पटेलने एका चाकू हल्ल्यात उडी घेत जखमी व्यक्तीचा जीव वाचवला. विशेष म्हणजे पोलीस आणि अँब्युलन्स येईपर्यंत तो जखमी व्यक्तीच्या संरक्षणासाठी तिथेच थांबला.

Actor Dev Patel: रीलसोबतच रिअल लाईफ हिरो: चाकू हल्ला रोखण्यासाठी स्वतःचा जीव घातला धोक्यात, अन्...
कैनबरा: 'स्लमडॉग मिलेनियर'सारख्या चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेला भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल रिल लाईफ हिरो होताच, पण आता तो रिअल लाईफ हिरोही झाला आहे. देव पटेलने स्वतःचा जीव धोक्यात घालून एका अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवला. एका जोडप्यामध्ये सुरू झालेल्या वादाचे रुपांतर चाकू हल्ल्यात झाले, या वादात देवने उडी घेतली आणि जखमी व्यक्तीचा जीव वाचवला.
पोलिस येईपर्यंत देव तिथेच थांबला
देव हा ऑस्ट्रेलियातील अॅडलेडचा रहिवासी असून, ही घटनाही तिथे घडली आहे. मंगळवारी देव त्याच्या मित्रांसह अॅडलेडमधील एका जनरल स्टोअरमध्ये गेला होता. दुकानाजवळ एक जोडपे भांडत होते, भांडत असताना महिलेने त्या व्यक्तीच्या छातीवर चाकूने वार केले. यानंतर देव आणि त्याचे मित्र त्या भांडणात पडले आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवला. विशेष म्हणजे, पोलीस आणि रुग्णवाहिका येईपर्यंत जखमी व्यक्तीला सुरक्षित ठेवण्यासाठी देव तिथेच उभा होता.
चाहत्यांनी देवचे कौतुक केले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील जखमी व्यक्तीची प्रकृती सध्या ठीक आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या आरोपी महिलेला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर चाहते देव पटेलचे कौतुक करत आहेत. धोकादायक परिस्थितीत एखाद्याचा जीव वाचवणे मोठी कौतुकास्पद बाब आहे, असे चाहत्यांनी म्हटले.
18व्या वर्षी स्लमडॉग मिलियनेअर मिळाला
2008 मध्ये डॅनी बॉयलच्या स्लमडॉग मिलियनेअरया चित्रपटाने देव पटेल जगप्रसिद्ध झाला. या चित्रपटाने 8 ऑस्कर पुरस्कार जिंकले होते. देव याच्याशिवाय या चित्रपटात फ्रीडा पिंटो, अनिल कपूर हेदेखील होते. देवला 2016 च्या लायन चित्रपटासाठी ऑस्करमध्ये नामांकन मिळाले होते. या चित्रपटात त्याने एका भारतीय मुलाची भूमिका साकारली होती. याशिवाय द लास्ट एअरबेंडर, द मॅन व्हू न्यूव इन्फीनिटी आणि हॉटेल मुंबईसह अनेक चित्रपटात त्याने काम केले आहे.