गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अहमदाबादमध्ये झालेल्या विमानअपघाताने तर साऱ्या देशाला सुन्न करुन सोडले आहे. फक्त भारतातच नाही, तर इतर देशांमध्येही अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. दरम्यान, आता एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून तुमचा या घटनेवर विश्वास बसणार नाही. हजारो फूट आकाशात उडणाऱ्या विमानाच्या पंखाचा एक तुकडा अचानक तुटून रस्त्यावर पडला. सुदैवाने, पायलटने विमानाची सुरक्षित लँडिंग केली अन् कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.
बोईंग विमानाच्या पंखाचा तुकडा पडलान्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी डेल्टा कंपनीच्या बोईंग विमानाच्या पंखाचा एक तुकडा उड्डाणादरम्यान अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये कोसळला. असे असूनही, विमान सुरक्षितपणे उतरले. विशेष म्हणजे, पायलटला खाली आल्यानंतर त्याची माहिती मिळाली. सुदैवाने हा तुकडा खाली कुणाच्याही अंगावर पडला नाही, अन्यथा जीवितहानी झाली असती.
डेल्टा एअरलाईनच्या प्रवक्त्याने सांगितले की, निवासी भागात कोसळलेला पंखाचा फ्लॅप अटलांटाहून रॅले-डरहम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करणाऱ्या बोईंग ७३७ विमानाचा आहे. सुदैवाने पंखाचा तुकडा तुटूनदेखील विमानाची सुरक्षित लँडिंग झाली. विशेष म्हणजे, या विमानात १०९ प्रवासी होते. पायलटशिवाय, प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्सनाही विमानाचा तुकडा पडल्याचे समजले नाही.
विमानाचा वेग कमी करण्यासाठी या फ्लॅपचा वापर केला जातोविमानाचा वेग कमी करण्यासाठी आणि उंची राखण्यासाठी टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान पंखाच्या मागच्या बाजुला असलेल्या फ्लॅपचा वापर केला जातो. विंगजवळील खिडकीत बसलेल्या प्रवाशांनाच हा फ्लॅप्स पूर्णपणे दिसू शकतो.