लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 2,000 हून अधिक जणांचा मृत्यू; आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 11:38 AM2024-10-17T11:38:56+5:302024-10-17T11:41:14+5:30
Israeli Airstrikes in Lebanon : ही आकडेवारी 8 ऑक्टोबर 2023 पासून आत्तापर्यंतची आहे. यासंदर्भात लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.
Israeli Airstrikes in Lebanon : इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेच्या अनेक बड्या नेत्यांचा खात्मा केला. इस्रायलकडून हिजबुल्लाहवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमुळे लेबनॉनमधील आतापर्यंत 2,367 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 11,088 लोक जखमी झाले आहेत. ही आकडेवारी 8 ऑक्टोबर 2023 पासून आत्तापर्यंतची आहे. यासंदर्भात लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.
गुरुवारी मंत्रालयाने सांगितले की, 15 ऑक्टोबर रोजी लेबनॉनच्या विविध भागात इस्रायली हवाई हल्ल्यात मृतांची संख्या 17 झाली आहे आणि जखमींची संख्या 182 झाली आहे. शिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण भागात तीन जणांचा मृत्यू झाला असून 92 जण जखमी झाले आहेत. नाबातियेह प्रांतात नऊ जण ठार तर 49 जखमी झाले. त्याचवेळी बेका खोऱ्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहेत. याव्यतिरिक्त, बालबेक हरमेल प्रांतात 15 लोक जखमी झाले आहेत.
गेल्या महिन्यापासून म्हणजेच 23 सप्टेंबरपासून, इस्त्रायली सैन्य हिजबुल्लाहसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान लेबनॉनवर वेगाने हवाई हल्ले करत आहे. 8 ऑक्टोबर 2023 पासून इस्रायली सैन्य लेबनीज-इस्रायल सीमेवर गोळीबार करत आहे. तसेच, दुसरीकडे गाझा पट्टीत हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. गेल्या वर्षी इस्रायलने हमासवर केलेल्या हल्ल्यानंतर या हवाई मोहिमा वाढल्या आहेत. गाझा पट्टीवर इस्रायलच्या हल्ल्यात 42,400 हून अधिक लोक मारले गेले आहेत. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती
जगातील अनेक मोठे देश आणि संघटनांनी मध्यपूर्वेतील बिघडलेल्या परिस्थितीबाबत अनेक इशारे दिले आहेत. सर्व प्रयत्न करूनही शांतता चर्चा होऊ शकली नाही. दरम्यान, गाझा आणि लेबनॉनवर इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच होते. इस्रायलने 1 ऑक्टोबर रोजी दक्षिण लेबनॉनमध्ये प्रवेश करून जमिनीवर कारवाई सुरू केली, तेव्हा परिस्थितीने गंभीर वळण घेतले. त्यामुळे मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.