CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनची नवी खेळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:37 IST2025-05-21T15:20:40+5:302025-05-21T15:37:57+5:30
मागील काही दिवसापासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. आता हे संबंध सुधारण्यासाठी चीनने मोठी खेळी केली आहे.

CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनची नवी खेळी
मागील अनेक महिन्यांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. तर अफगाणिस्तान आणि भारताचे संबंध चांगले झाले आहेत. दरम्यान, आता चीनने नवीन खेळी सुरू केली आहे. बीजिंगमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर, आता चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत केला जाईल, अशी घोषणा चीनने केली आहे.
अफगाणिस्तानचे पाकिस्तानशी असलेले संबंध सुधारावेत म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जाते. याशिवाय, अफगाणिस्तानला भारतापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानच्या राजवटीत पाकिस्तानला धक्का बसला. आता चीनने नवीन खेळी केली आहे.
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
पुढची बैठक अफगाणिस्तानमध्ये होणार
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्यात बैठक झाली. यावेळी सीपीईसीचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, आता तिन्ही देशांची पुढील बैठक अफगाणिस्तानातच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी नेत्याने भारताने चालवलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहितीही चीनला दिली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते, यामध्ये पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. या कारवाईत सुमारे १०० दहशतवादी मारले गेल्याचे भारतीय लष्कराचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर इशाक अहमद दार यांनी चीन आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतचा फोटो शेअर केला. या पोस्टमध्ये लिहिले की, चीन, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि विकासासाठी एकत्र उभे आहेत.
गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानने चाबहार बंदरात रस दाखवला आहे हे सीपीईसीच्या विस्ताराचे एक कारण असल्याचे मानले जाते. हे बंदर भारताने इराणच्या सहकार्याने विकसित केले आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तान भारताच्या जवळ जाऊ नये यासाठी चीनने हे पाऊल उचलले आहे.