Coronavirus : ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स पाठवणार, आपण मिळून जिंकू; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी हिंदीत लिहिला संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 17:51 IST2021-04-27T17:50:30+5:302021-04-27T17:51:47+5:30
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी हिंदीत संदेश लिहित मदत पाठवण्याचं दिलं आश्वासन. सध्या मोठ्या प्रमाणात देशात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या

Coronavirus : ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स पाठवणार, आपण मिळून जिंकू; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी हिंदीत लिहिला संदेश
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. देशात सातत्यानं दररोज ३ लाखांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडताना दिसत आहे. भारताच्या या कठीण काळात काही देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. फ्रान्सनंदेखीलभारतीयांसाठी मदतीचा हात पुढे केला असून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच फ्रान्स कायमच भारतीयांसोबत असल्याचा संदेशही त्यांनी हिंदीतून लिहिला आहे.
"आपण ज्या महासाथीच्या संकटातून जात आहोत त्यापासून कोणीही दूर राहिलेला नाही. भारत सध्या कठीण काळातून जात आहे हे आम्ही जाणतो. फ्रान्स आणि भारत कायमच एकत्र होते. आम्ही मदत पोहोचवण्यासाठी काम करत आहोत," असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांनी म्हटलं आहे. त्यांनी यांसदर्भात हिंदीतून एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
"फ्रान्स भारताला वैद्यकीय उपकरणं ज्यामध्ये व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन आणि ८ ऑक्सिजन जनरेटर्स पाठवेल. प्रत्येक जनरेटर ऑक्सिजनचं उत्पादन करून एका रुग्णालयाला पुढील १० वर्षांसाठी आत्मनिर्भर करू शकेल," असंही ते म्हणाले. आमच्या मंत्रालयाचे विभाग वेगानं काम करत आहे. आमच्या कंपन्याही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहोत. एकजुट राहणं हे आमच्या राष्ट्राचं ध्येय आहे. दोन्ही देशांमध्ये मैत्रीला मोठं महत्त्व आहे आणि आपण एकत्र राहून ही लढाई नक्कीच जिंकू असा विश्वासही मॅक्राँ यांनी व्यक्त केला.