CoronaVirus News: ना अमेरिका, ना ब्रिटन; 'या' देशानं घेतली आघाडी, महिना अखेरपासून लसीकरणाची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 09:17 IST2020-08-02T09:17:21+5:302020-08-02T09:17:56+5:30
CoronaVirus News: ऑगस्टच्या अखेरपासून लसीकरण करण्याचा विचार; डॉक्टर, शिक्षकांना लस देण्यात येणार

CoronaVirus News: ना अमेरिका, ना ब्रिटन; 'या' देशानं घेतली आघाडी, महिना अखेरपासून लसीकरणाची तयारी
मॉस्को: जगातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ८० लाखांच्या पुढे गेली असून मृतांचा आकडा सात लाखांच्या जवळपास पोहोचला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता अवघ्या जगाचं लक्ष लसीकडे लागलं आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक असल्यानं अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यातच आता रशियानं थेट सार्वजनिक लसीकरणाची तयारी सुरू केली.
ऑगस्टच्या अखेरीस डॉक्टर आणि शिक्षकांना कोरोनाची लस देण्याचा विचार रशियन सरकारकडून सुरू आहे. रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी याबद्दल विधान केलं आहे. मॉस्कोतल्या गमालेया संशोधन संस्थेनं कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण केल्या असून त्यासाठी आवश्यक नोंदणीचं काम सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. 'गमालेया संस्थेनं तयार केलेल्या कोरोनावरील लसीनं चाचण्या पूर्ण केल्या आहेत,' अशी माहिती आरोग्यमंत्री मुकाश्को यांनी पत्रकारांनी दिल्याचं वृत्त स्पुटनिक या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
ऑक्टोबरमध्ये देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येईल, असं मुकाश्को म्हणाले. 'सध्या अनेकांवर कोरोना लसीची चाचणी सुरू आहे. या चाचणीचे निष्कर्ष उत्सावर्धक आहेत,' असंदेखील त्यांनी म्हटलं. आरोग्य मंत्र्यांच्या विधानाप्रमाणे रशियानं खरोखरच सार्वजनिक लसीकरण सुरू केल्यास तसं करणारा तो जगातला पहिला देश ठरेल.
१० ते १२ ऑगस्ट दरम्यान कोरोना लसीची नोंदणी करणार असल्याचं रशियानं याआधी सांगितलं होतं. तशा प्रकारची नोंदणी झाल्यास ती जगातली कोरोनावरील पहिली लस ठरेल. कोरोना बाधितांच्या संख्येत रशिया जगात चौथ्या स्थानी आहे. रशियातील कोरोना रुग्णांचा आकडा ८ लाख ४५ हजार ४४३ वर पोहोचली आहे. रशियात आतापर्यंत कोरोनामुळे १४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.