Coronavirus: कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढला; अमेरिकेच्या ‘या’ शहरातून श्रीमंतांनी पळ काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 09:24 IST2020-05-19T09:10:22+5:302020-05-19T09:24:25+5:30
एकट्या न्यूयॉर्क राज्यात कोरोनामुळे २८ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus: कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढला; अमेरिकेच्या ‘या’ शहरातून श्रीमंतांनी पळ काढला
न्यूयॉर्क – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील बहुतांश लोक दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत. जगातील बलाढ्य देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेला आतापर्यंत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत १५ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ९० हजाराहून जास्त लोकांचा जीव गेला आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वाधिक परिणाम पाहायला मिळाला. या शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने न्यूयॉर्क शहरातील श्रीमंत लोकांनी दुसऱ्या शहरात पळ काढला असल्याचं एका अहवालात उघड झालं आहे. एकट्या न्यूयॉर्क राज्यात कोरोनामुळे २८ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, लाखो लोक न्यूयॉर्क शहरातून इतर भागात पलायन करत आहे. त्यापैकी, शहराच्या श्रीमंत भागातून इतर राज्यात जाणारे बरेच लोक आहेत.
वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन लोकेशन डेटा विश्लेषणाद्वारे शहरातून प्रवास करणाऱ्या लोकांचा शोध घेतला आहे. न्यूयॉर्क शहरातील लोकसंख्येपैकी सुमारे ५ टक्के लोकसंख्या म्हणजे सुमारे ४ लाख २० हजार लोक इतर भागात गेले आहेत. मार्चमध्ये न्यूयॉर्क शहरातील ५६ हजार लोकांनी यूएस पोस्टल सर्व्हिसला मेल फॉरवर्ड करण्यासाठी विनंती केली. ही सहसा महिन्यात दोनदा विनंती केली जाते. त्याचबरोबर एप्रिलमध्ये ही संख्या वाढून ८१ हजार झाली होती. ज्यांनी अशी विनंती केली त्यांच्यापैकी ६० टक्के लोक असे होते ज्यांनी न्यूयॉर्क शहराबाहेर मेल फॉरवर्ड करण्याची मागणी केली.
अभ्यासानुसार अप्पर ईस्ट साइड, वेस्ट व्हिलेज, सोहो, ब्रूकलिन, न्यूयॉर्क हा श्रीमंत लोकांचा भाग आहे. येथील लोकसंख्या ४० टक्क्यांनी खाली आली आहे. तथापि, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद पडल्यामुळे या भागात राहणारे विद्यार्थी शहरातून बाहेर गेले आहेत. काही लोक मित्र किंवा कुटुंबाची काळजी घेण्यासाठी शहर सोडून गेले. परंतु शहरातून जाणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या संख्येने उच्च उत्पन्न असलेले लोक असल्याचं आढळून आले आहे. १५ मार्चनंतर शहर सोडणार्या लोकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली. त्यावेळी न्यूयॉर्कच्या महापौरांनी शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली होती. सर्वाधिक उत्पन्न असणार्या लोकांचे भाग मोठ्या प्रमाणात रिकामे झाले होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
डोनाल्ड ट्रम्प यांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली; कोरोनावर लस मिळण्याची आशा वाढली!
X-ray मार्फत कोरोनाचं निदान होणार, फक्त 5 मिनिटांत रिझल्ट मिळणार?
राज्याचा आकडाही ३५ हजारांवर; आतापर्यंत ८,४३७ लोक कोरोनामुक्त
मोदी सरकारवर शिवसेनेचा घणाघात; राहुल गांधीवरील टीकेचाही घेतला समाचार, म्हणाले...