Coronavirus: मोदी सरकारवर शिवसेनेचा घणाघात; राहुल गांधीवरील टीकेचाही घेतला समाचार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 07:34 AM2020-05-19T07:34:20+5:302020-05-19T07:37:34+5:30

बाजूच्या देशांतील अल्पसंख्याक हिंदूंना पायघड्या घालणारी ही सरकारे आज बाजूच्या राज्यांतील आपल्याच बांधवांना स्वीकारायला तयार नाहीत. या अमानुष अस्पृश्यतेस काय म्हणावे? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

Coronavirus: Shiv Sena's attack on Modi government also reaction on Rahun Gandhi Criticized pnm | Coronavirus: मोदी सरकारवर शिवसेनेचा घणाघात; राहुल गांधीवरील टीकेचाही घेतला समाचार, म्हणाले...

Coronavirus: मोदी सरकारवर शिवसेनेचा घणाघात; राहुल गांधीवरील टीकेचाही घेतला समाचार, म्हणाले...

Next
ठळक मुद्देआपण पुन्हा ‘मूकपटा’च्या जमान्यात किंवा जंगलयुगात जाणार? हे तूर्त तरी रहस्यच राहिले आहे.आपल्याच लोकांविषयी सरकारे असे कसे काय वागू शकतात?यापुढे माणुसकी व परंपरेच्या गप्पा मारू नयेत, भाजपावर टीकास्त्र

मुंबई - राहुल गांधी हे दिल्लीच्या रस्त्यांवर त्या मजुरांसोबत थांबले, थोडा वेळ बसले आणि बोलले. यावर निर्मलाताईंना अत्यंत दु:ख व्हावे हे आक्रितच म्हणावे लागेल. कुणी श्रमिकांचे दु:ख हलके करीत असेल तर सरकारला त्याचा आनंद व्हायला हवा, पण इथे उलटेच सुरू आहे. मंत्री लॉक डाऊन कुरवाळत बसले आहेत. मजूर लॉक डाऊन तोडून कच्च्या-बच्च्यांसह रस्ते तुडवत निघाले आहेत असा टोला सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपा सरकारला लगावला आहे.

तसेच रस्त्यांवर विरोधी पक्षाचा एक नेता गांधी नावास जागून मजुरांना कवटाळत उभा राहिला याचे ज्यांना दु:ख होते त्यांनी यापुढे माणुसकी व परंपरेच्या गप्पा मारू नयेत. आपल्याच लोकांना राज्यात घ्यायला त्यांचा विरोध आहे व मजुरांचे दु:ख विचारणाऱ्यांचा द्वेष आहे. कोरोनाने नवे कलियुग आणले आहे खरे असा आरोप केला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे  

  • लॉक डाऊन 31 मेपर्यंत वाढवला यात धक्का बसावा असे काहीच नाही. केंद्र आणि राज्य सरकारांपुढे दुसरा पर्याय तरी काय होता? हा चौथा लॉक डाऊन देशव्यापी आहे, पण तो काटेकोरपणे पाळला जाईल काय याबाबत शंका आहेत.
  • दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ सर्वच ‘बंद’ आहे. त्या बंदच्या काळकोठडीतून बाहेर पडण्यासाठी लोक धडपडत आहेत. आता हा जो चौथा ‘लॉक डाऊन’ घोषित केला आहे त्यातून जनजीवनासाठी काही खास सूट दिली आहे असे दिसत नाही.
  • मेट्रो, रेल्वे सेवा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल, जिम वगैरे बंदच राहतील. हे ‘बंद’ प्रकरण वाढवले असले तरी लोक खरोखर ‘बंद’चे पालन करू शकतील काय? आजचे चित्र भयावह आहे. स्थलांतरित मजुरांची पायपीट आणि ससेहोलपट सुरूच आहे.
  • महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांतून हे मजूर उत्तर प्रदेशात जायला निघाले तेव्हा त्यांना केंद्र सरकारने रोखले नाही. त्यांची व्यवस्था केली नाही. उत्तर प्रदेशच्या सीमेवर हे लाखो मजूर पोहोचले तेव्हा त्यांना तेथेच अडकवून ठेवले. उत्तर प्रदेशच्या सीमेत त्यांना येऊ देऊ नये, असे आदेश आहेत. यात महिला, लहान मुले, वृद्ध मोठ्या प्रमाणावर आहेत. अशी परिस्थिती इतर राज्यांमध्ये देखील आहे.
  • आपल्याच लोकांविषयी सरकारे असे कसे काय वागू शकतात? बाजूच्या देशांतील अल्पसंख्याक हिंदूंना पायघड्या घालणारी ही सरकारे आज बाजूच्या राज्यांतील आपल्याच बांधवांना स्वीकारायला तयार नाहीत. या अमानुष अस्पृश्यतेस काय म्हणावे? अशा परिस्थितीत चौथ्या लॉक डाऊनची घोषणा सरकारने केली म्हणून चिंता वाटते.
  • लोकांची घरात बसायची तयारी आहे, पण भविष्याचा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे. वृत्तवाहिन्यांवर अशी काही चित्रे दिसली ती ‘सोमालिया’सारख्या देशातील स्थितीची आठवण करून देणारी आहेत. भुकेने बेजार झालेले लोक एकमेकांच्या हातातील अन्न-धान्य खेचून हाणामाऱ्या करीत आहेत.
  • जबलपूर रेल्वे स्थानकावर अशीच घटना घडली. बंगळुरू-हाजीपूर ही मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे तेथे थांबली असता जेवणाचे पॅक वेळेवर न मिळाल्याने संतप्त झालेल्या मजुरांनी स्थानकावरील फूड स्टॉल, फूड व्हेण्डिंग मशीनची तोडफोड केली आणि तेथील अन्नपदार्थांची लूट केली. अशाप्रकारचा गोंधळ आज मर्यादित स्वरूपात दिसत असला तरी उद्या भडका उडायला वेळ लागणार नाही.
  • दैनंदिन व्यवहार काही ठिकाणी टप्प्याटप्प्यांत सुरू होतील असे म्हणतात. हे टप्पे नेमके कधी सुरू होतील ते सांगणे कठीण आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर मुंबईतून मोठ्या संख्येने ‘चाकरमानी’ कोकणात निघाले आहेत, पण त्यांनाही अनेक ठिकाणी जिल्हाबंदी केली आहे. स्थानिकांनी मुंबईकरांना जिल्ह्यांत आणि गावांत प्रवेशबंदी केली आहे.
  • एका भीतीच्या विळख्यात महाराष्ट्र सापडला आहे. ही भीती दूर करायची की वाढवत ठेवायची, यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे रुग्णवाढीचा वेग कमी होताना दिसत नाही.
  • राज्यात कोरोनाबाधितांचा  आकडा 30 हजारांवर गेला. मुंबईत 20 हजारांच्या आसपास आहे. मुख्यमंत्री व त्यांचे सरकार कोरोनाशी झटापट करीत आहे, पण कोरोना वाढतोच आहे. नवी इस्पितळे वेगाने उभारली जात आहेत व कोरोनाग्रस्तांसाठी त्यांचे लोकार्पण सुरू आहे. भविष्यात राज्य सरकारांना बहुधा हेच एकमेव काम करावे लागेल असेच चित्र दिसत आहे.
  • शैक्षणिक संस्था कधी उघडणार? कामगार कामावर कधी जाणार? (अर्थात नोकऱ्य़ा टिकल्या तर!) आकाशात विमाने कधी घिरट्या मारणार? रेल्वे रूळांवर लोकल्स कधी धडधडणार? बससेवा कधी सुरू होणार? मुंबईतील चित्रपटगृहांचा पडदा कधी बोलू लागणार? की आपण पुन्हा ‘मूकपटा’च्या जमान्यात किंवा जंगलयुगात जाणार? हे तूर्त तरी रहस्यच राहिले आहे.
  • हे सर्व टप्प्याटप्प्याने चालू करायचा विचार करावा तर मुंबईतील 20 हजार कोरोनाग्रस्तांचा आकडा धोक्याची घंटा वाजवत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाताई रोज पत्रकार परिषदा घेऊन याला किंवा त्याला पॅकेज देण्याच्या घोषणा करीत आहेत. ते पॅकेज लोकांच्या मुखापर्यंत पोहोचेल तो दिवस खरा.

Web Title: Coronavirus: Shiv Sena's attack on Modi government also reaction on Rahun Gandhi Criticized pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.