COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:06 IST2025-05-16T15:59:28+5:302025-05-16T16:06:38+5:30
Corona Virus News : हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोविड-१९ रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, स्थानिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
जगभर थैमान घातल्यानंतर काही काळ स्थिर झालेला कोरोनाचा विषाणू पुन्हा एकदा आशियात डोके वर काढताना दिसतो आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोविड-१९ रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, स्थानिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
हाँगकाँगमध्ये रुग्णांची नोंद वाढली
हाँगकाँगच्या आरोग्य संरक्षण केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, ३ मेच्या आठवड्यात ३१ गंभीर प्रकरणे समोर आली आहेत, ही संख्या गेल्या एका वर्षातील सर्वाधिक आहे. संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख अल्बर्ट औ यांनी या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केलं की, पॉझिटिव्ह प्रकरणांची टक्केवारीही आता उच्च पातळीवर पोहोचली आहे. मात्र, सध्याची रुग्णसंख्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या लाटेपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. तरीही, या नव्या लाटेमुळे शहरातील रुग्णालयांवर ताण वाढत असल्याचे दिसत आहे.
सिंगापूरमध्ये २८% रुग्णवाढ, आरोग्य मंत्रालय सतर्क
दुसरीकडे, सिंगापूरमध्ये देखील कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, ३ मेच्या आठवड्यात रुग्णसंख्या अंदाजे १४,२०० इतकी झाली असून, ही संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत २८% अधिक आहे. ही वाढ लक्षात घेता सिंगापूरनेही हाय अलर्ट जाहीर केला आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
दोन्ही शहरांमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, मास्कचा वापर, गर्दीपासून दूर राहणे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.