Corona vaccine : कोरोना लस ठरली काळ? या देशात लसीकरणानंतर २३ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 18:11 IST2021-01-16T18:10:14+5:302021-01-16T18:11:18+5:30
Corona vaccination Update : काही देशांमध्ये कोरोनाच्या लसीकरणाचे विपरित परिणाम दिसून येत असून, नॉर्वेमध्ये कोरोनाच्या लसीकरणानंतर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २३ वर पोहोचली आहे.

Corona vaccine : कोरोना लस ठरली काळ? या देशात लसीकरणानंतर २३ जणांचा मृत्यू
ओस्लो - गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता जगभरात कोरोनाविरोधातील लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. मात्र काही देशांमध्ये कोरोनाच्या लसीकरणाचे विपरित परिणाम दिसून येत असून, नॉर्वेमध्ये कोरोनाच्या लसीकरणानंतर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २३ वर पोहोचली आहे. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू हा कोरोना लसीच्या दुष्परिणामांमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर नॉर्वेने कोरोना लसीकरणाबाबतचया मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तत्काळ प्रभावाने बदल केला आहे.
नॉर्वेमध्ये कोरोना लसीकरणामुळे २३ जणांचा मृत्यू झाला असतानाच दुसरीकडे अन्य एक युरोपियन देश असलेल्या बेल्जियममध्येही फायझर या कंपनीची कोरोनावरील लस घेणाऱ्या एका व्यक्तीचा लस घेतल्यानंतर पाच दिवसांनी मृत्यू झाला आहे. दरम्यान, नॉर्वेमध्ये झालेल्या मृत्यूच्या घटनांवर बारीक लक्ष असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
मात्र मृत्यूच्या घटना घडत असल्या तरी नॉर्वेने कोरोनावरील लसीकरणाचे काम सुरू ठेवले आहे. नॉर्वेमध्ये लस घेतल्यानंतर मृत्यूमुखी पडलेले सर्व लोक हे ८० वर्षांवरील होते. तसेच ते रुग्णालयात दाखल होते. नॉर्वेच्या मेडिसिन एजन्सीच्या मेडिकल डायरेक्टर स्टेइनार मेडसेन यांनी सांगितले की, डॉक्टरांनी सावधपणे अशा लोकांची ओळख पटवली पाहिजे ज्यांना लस द्यायची आहे. जे लोक गंभीर आजारी असतील किंवा अखेरचे श्वास घेत असतील त्यांची पूर्णपणे तपासणी केल्यानंतरच त्यांना लस दिली गेली पाहिजे.