चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; लॉकडाऊनमध्ये वाढ; राजकीय कार्यक्रम रद्द
By मोरेश्वर येरम | Updated: January 12, 2021 14:05 IST2021-01-12T14:04:18+5:302021-01-12T14:05:50+5:30
कोरोना व्हायरसाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान प्रांतातच आढळून आला होता.

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; लॉकडाऊनमध्ये वाढ; राजकीय कार्यक्रम रद्द
बिजिंग
चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. यासोबतच बिजिंगमध्ये होणाऱ्या सर्व राजकीय परिषद रद्द करण्यात आल्या आहेत.
बिजिंगच्या दक्षिणेला असलेल्या गुआन शहरातील नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील सात दिवसांसाठी प्रशासनाकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. वुहान प्रांतातही अनेक कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
कोरोना व्हायरसाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान प्रांतातच आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण जग आज या विषाणूचा सामना करत आहे. हुबेई येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात होणारी पीपल्स काँग्रेस आणि सल्लागार समितीची परिषद देखील रद्द करण्यात आली आहे. हुबेई येथे मंगळवारी ४० नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती तेथील आरोग्य विभागाने दिली आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका लग्नसोहळ्यानंतर उपस्थित असलेल्या ३०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर बिजिंगमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचाही रुग्ण आढळला आहे. चीनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८७,५९१ इतकी झाली आहे. तर ४,६३४ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध आणण्यात आले आहेत. तर शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचा एक चमू गुरुवारी चीनमध्ये दाखल होणार आहे. कोरोनाच्या उगमाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ वुहानमध्ये संशोधन करणार आहेत.