कोरोना असेल वा नसेल, ऑलिम्पिक होणारच! - जपानचा हा हट्ट का आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 04:33 AM2020-10-07T04:33:57+5:302020-10-07T04:34:12+5:30

सुन्यासुन्या वातावरणात खेळाडू येतात, खेळतात, हरतात-जिंकतात... आता हेच सारं ऑलिम्पिकमध्येही होईल का?

corona crisis why is Japan so stubborn about Olympics | कोरोना असेल वा नसेल, ऑलिम्पिक होणारच! - जपानचा हा हट्ट का आहे?

कोरोना असेल वा नसेल, ऑलिम्पिक होणारच! - जपानचा हा हट्ट का आहे?

Next

कोरोना असो वा नसो टोक्यो ऑलिम्पिक जुलै २०२१ मध्ये होणारच, असं स्पष्ट मत जपानच्या ऑलिम्पिकमंत्र्यांनी काल एका पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आणि ऑलिम्पिक हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. एकीकडे जगभर बिना प्रेक्षकांच्या स्पर्धा आता सुरू होऊ लागल्या आहेत. इंग्लंड-पाकिस्तान-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका, अमेरिकन ओपन टेनिस आणि आता आयपीएल... लोक घरी बसून सामने पाहतात, एन्जॉयही करतात. मात्र जिथे खेळ खेळला जातो, त्या स्टेडियममध्ये प्रेक्षकच नाहीत ! सुन्यासुन्या वातावरणात खेळाडू येतात, खेळतात, हरतात-जिंकतात... आता हेच सारं ऑलिम्पिकमध्येही होईल का?

नाही म्हणायला कोरोनामुळे आॅलिम्पिक वर्षभर पुढे ढकलण्यात आलं. जुलै २०२०ला सुरू होणारी आॅलिम्पिक स्पर्धा आता २३ जुलै २०२१च्या मुहूर्तावर ठरली आहे. म्हणजे सारं नियोजन तरी तसंच आहे, खेळ-तारखा-जागा-वेळा ठरलेल्या आहेत. प्रेक्षकांना जी तिकिटं विकण्यात आली, तीही पुढच्या स्पर्धेसाठी वैध आहेत. मात्र तरीही एक प्रश्न आहेच की, जुलै २०२१ पर्यंत कोरोना संसर्गाची परिस्थिती काय असणार? जगभरातले खेळाडू जपानमध्ये पोहोचू शकतील का? पोहोचले तर ते सुरक्षित असतील का, स्थानिकांना त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असेल का?

- मात्र जपानचे आॅलिम्पिकमंत्री साईको हाशिमोटो यांनी या साऱ्या प्रश्नांना एका वाक्यात उत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘आम्हीच नाही तर जगभरातले खेळाडूही आॅलिम्पिकची तयारी करत आहेत. आॅलिम्पिकसारखी स्पर्धा होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे स्पर्धा होतील, साधेपणाने होतील; पण होतीलच!’

इंटरनॅशनल आॅलिम्पिक कमिटीचे उपाध्यक्ष जॉन कोट्स यांनी एएफपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, ‘कोरोना असो वा नसो, आॅलिम्पिक होईल!’
आॅलिम्पिक स्पर्धा होणं जगभरातल्या क्रीडापटू आणि प्रेक्षकांसाठीच नाही तर जपानसाठीही वेगळ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. एकतर देशात आॅलिम्पिक होणार म्हणून जी महाप्रचंड तयारी करावी लागते ती जपानने केली आहे.

त्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूकही केली आहे. आॅलिम्पिक पुढं ढकललं गेल्यानं जपानला आधीच मोठा आर्थिक तोटा झाला आहे. आॅलिम्पिकमुळे जपानी पर्यटनाला जो फायदा झाला असता, तोही आता धोक्यात आहे. आता आॅलिम्पिक स्पर्धा समजा खरंच नव्या वेळापत्रकानुसार झाल्या, तरी किती पर्यटकांना देशात यायची परवानगी असणार, मुळात विदेशातून किती लोक स्वत:हून यायला तयार होतील, स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगीच नाकारावी लागली तर मग विदेशातून प्रेक्षक-पर्यटक येणार तरी कसे, असे अनेक प्रश्न आहेत.

आॅलिम्पिकसाठी तिकीट विक्री झाली आहे. त्याला अनुसरून झालेली हॉटेल बुकिंग्जदेखील वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे; पण समजा नव्या संदर्भात कोरोना-संसर्गाचा धोका कायम राहिला आणि प्रत्यक्ष स्टेडियममध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहायला परवानगीच नाकारली गेली तर याचाही मोठा आर्थिक फटका आयोजकांना, पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिकांना बसू शकतो. आपली अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी जपानची बºयापैकी भिस्त या आॅलिम्पिकवर होती, अजूनही आहे. त्यामुळे आॅलिम्पिक आयोजन व्हावं यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. इतकंच कशाला तर कोरोना प्रसार रोखावा म्हणून स्थानिक पातळीवर आत्तापासूनच अतिशय कठोर नियम, अंमलबजावणी सुरू झाली आहे.

हे सारं असं भिजत घोंगडं असताना जपानमध्ये सत्ताबदलही होतो आहे. पंतप्रधान शिंजो अबे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला. त्यांच्या जागी सत्ता धारण केलेले नवे पंतप्रधान योशिहिदे सुगाही म्हणतात की, आॅलिम्पिक पार पडावं म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. उच्चतम धैर्य, अचूकता आणि गुणवत्तेचं प्रतीक असलेल्या आॅलिम्पिकची आणि पर्यायानं जपानचीही या कोरोनाकाळात ही मोठीच परीक्षा आहे, हे नक्की!

Web Title: corona crisis why is Japan so stubborn about Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.