"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:09 IST2025-04-28T11:06:17+5:302025-04-28T11:09:45+5:30

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदीचे वादग्रस्त विधान केले आहे.

Controversial statement of former Pakistani captain Shahid Afridi on the terrorist attack in Pahalgam | "स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार

"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार

Shahid Afridi on Pahalgam Attack: पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांची दहशवाद्यांनी हत्या केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर जगभरातून पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या श्रद्धांजली वाहिली जात आहे. दुसरीकडे दहशतवाद्यांना नेहमीच पाठीशी घालणाऱ्या शेजारील पाकिस्तानकडून भारतावरच आरोप केले जात आहेत. भारताने सिंधू जल करार स्थगित करण्यासारखी कठोर निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील सत्ताधारी नेते भारताला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू खेळाडू शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. शाहिद आफ्रिदीने या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरल्यामुळे लोक संतापले आहेत. शाहिद आफ्रिदीने भारताकडून पुरावे मागितले आहेत. भारताने आधी हे सिद्ध करावे की या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, असं आफ्रिदीने म्हटलं. त्यामुळे आफ्रिदीच्या विधानाने भारताच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

एका मुलाखतीदरम्यान, बोलताना शाहिद आफ्रिदीने पहलगाम हल्ल्याबद्दल भाष्य केले. "पाकिस्तानचा राजदूत म्हणून मी म्हणेन की स्पोर्टस डिप्लोमसीवर माझी भूमिका खूप स्पष्ट आहे. यावर कोणतेही राजकारण होऊ नये. आपण शेजारी देश आहोत, आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. पण गोष्ट अशी आहे की हा प्रसंग नुकताच घडला आहे आणि तुम्ही थेट पाकिस्तानचे नाव घेतले. निदान तुम्ही पुरावे घेऊन यावं आणि जगाला सांगावे. कोणताही धर्म दहशतवादाचे समर्थन करत नाही. तिथे जे घडले ते दुःखद आहे. पाकिस्तानमध्ये जे घडत आहे ते देखील खेदजनक आहे. अशा गोष्टी घडू नयेत. मला वाटतं की आपले एकमेकांशी चांगले संबंध असले पाहिजेत. लढाईचा कोणताही उपयोग होणार नाही," असे शाहिद आफ्रिदी म्हणाला.

"त्या दहशतवाद्यांनी एक तास तिथे दहशतवाद माजवली होती पण तुमच्या ८ लाख सैनिकांपैकी कोणीही तिथे गेले नाही आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी १० मिनिटांत पाकिस्तानला दोष दिला. ते स्वतःच चुका करतात, ते स्वतःच लोकांना मारतात आणि नंतर ते स्वतःच व्हिडीओ दाखवतात आणि म्हणतात की ते जिवंत आहेत. असं करु नका. पाकिस्तान हा आमचा धर्म आहे, इस्लाम शांततेबद्दल बोलतो. आम्ही भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आम्हाला तिथून नेहमीच धमक्या येत असतात. आम्हाला माहितही नव्हते की आम्ही तिथे खेळायला जाऊ की नाही. २०१६ च्या विश्वचषकात मी कर्णधार होतो, आम्ही लाहोरमध्ये होतो आणि आम्हाला माहित नव्हते की आमचे भारतात विमान असेल की नाही. म्हणूनच मी म्हणतो की स्पोर्टस डिप्लोमसी ही सर्वोत्तम आहे. तुमचा कबड्डी संघ येतो, पण क्रिकेट संघ येत नाही. जर तुम्हाला करायचे असेल तर ते पूर्णपणे बंद करा अन्यथा ते करू नका," असेही शाहिद आफ्रिदीने म्हटलं.

Web Title: Controversial statement of former Pakistani captain Shahid Afridi on the terrorist attack in Pahalgam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.