"पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखासह जेवताना ट्रम्प ओसामाला विसरणार नाहीत अशी आहे"; शशी थरूर यांनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:10 IST2025-06-19T17:04:35+5:302025-06-19T17:10:43+5:30
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीवरुन खिल्ली उडवली आहे

"पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखासह जेवताना ट्रम्प ओसामाला विसरणार नाहीत अशी आहे"; शशी थरूर यांनी उडवली खिल्ली
Shashi Tharur Asim Munir United States Visit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या भेटीवरुन जोरदार चर्चा सुरु झालीय. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीवरुन खिल्ली उडवली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. इस्लामाबाद आणि वॉशिंग्टनमधील लष्करी व धोरणात्मक संबंध अधिक बळकट करण्यासाठी मुनीर हे ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे, असीम मुनीर यांना जेवणासाठी आमंत्रित केल्यानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अमेरिकेला ओसामा बिन लादेन आणि ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यांची आठवण करून दिली.
"पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांना जेवण करताना अमेरिकेने त्यांना दहशतवाद रोखण्याचे निर्देश दिले असतील अशी अपेक्षा आहे. जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अमेरिकेत घुसून २ हजारांहून अधिक लोकांना ठार मारले होते, तो दिवस अमेरिकेने विसरू नये," असं शशी थरुर यांनी म्हटलं आहे.
"मला आशा आहे की जेवण चांगले झाले असेल आणि त्यांना विचार करण्यासाठी थोडा वेळ मिळाला असेल. मला आशा आहे की या बैठकीत अमेरिकने पाकिस्तानला आठवण करून दिली असेल की त्यांनी दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये आणि त्यांना प्रशिक्षण देऊ नये," असंही थरुर म्हणाले.
"ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेत पोहोचलेल्या पाकिस्तानी शिष्टमंडळाला अमेरिकन सिनेटर आणि काँग्रेसमननी दहशतवाद पसरवण्याविरुद्ध कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. अमेरिकेतील लोक ओसामाला इतक्या लवकर विसरू शकत नाहीत. ओसामा पाकिस्तानी लष्करी तळाजवळ एका सुरक्षित ठिकाणी सापडला. ओसामाला लपवण्याची पाकिस्तानची चूक अमेरिका सहजपणे विसरू शकणार नाही आणि माफही करू शकणार नाही. मला आशा आहे की जेव्हा जनरलला वाइन देण्यात येईत तेव्हा त्यांना या सर्व गोष्टींची आठवण येईल आणि हे अमेरिकेच्या हिताचे आहे," असंही शशी थरुर म्हणाले.
बुधवारी ट्रम्प यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर यांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणण्यात मुनीर यांनी मला मदत केल्याचे ट्रम्प म्हणाले, "पाकिस्तानकडून परिस्थिती शांत करण्यात असीम मुनीर यांचा खूप प्रभाव होता आणि भारताकडून पंतप्रधान मोदींनीही मोठे योगदान दिले," असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.
#WATCH | Thiruvananthapuram, Kerala | On US President Donald Trump's lunch meeting with Pakistan Army Chief Asim Munir, Congress MP Shashi Tharoor says, "I hope the food was good and he gets some food for thought in the process. I hope that in these interactions, the Americans… pic.twitter.com/QJn6BHEjoY
— ANI (@ANI) June 19, 2025
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सय्यद असीम मुनीर यांना अमेरिकेच्या आर्मी डेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र हे वृत्त खोटं असल्याचं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं. अमेरिकन लष्कराच्या परेडसाठी असीम मुनीर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेलं नाही, असं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं.