अभिमानास्पद! जगातील सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांत सत्यजित रे यांचा ‘पाथेर पांचाली’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:50 IST2018-11-02T04:24:27+5:302018-11-02T06:50:35+5:30
जगभरातील १०० सर्वोत्कृष्ट चित्रपटांत भारतातील अन्य भाषांतील सोडाच; पण हिंदी भाषेतीलही चित्रपटाला स्थान मिळालेले नाही.

अभिमानास्पद! जगातील सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांत सत्यजित रे यांचा ‘पाथेर पांचाली’
नवी दिल्ली : बीबीसीने २१ व्या शतकातील जगभरातील विदेशी भाषांतील (इंग्रजी वगळता) सर्वोत्कृष्ट १०० चित्रपट कोणते, हे निश्चित करण्यासाठी सर्व देशांतील काही समीक्षकांचा पोल घेतला. त्या १०० चित्रपटांत भारतातील एकच चित्रपट त्यात असून, तोही ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे यांचा अतिशय गाजलेला ‘पाथेर पांचाली’ हाच आहे.
जगभरातील १०० सर्वोत्कृष्ट चित्रपटांत भारतातील अन्य भाषांतील सोडाच; पण हिंदी भाषेतीलही चित्रपटाला स्थान मिळालेले नाही. पाथेर पांचाली हा बंगाली चित्रपट भारतात १९५५ साली प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांमध्ये १५ व्या स्थानी आहे.
बीबीसीने निवडलेल्या १०० चित्रपटांत पहिल्या स्थानावर अकिरा कुरोसावा यांचा ‘सेवन सामुराई’ या जपानी चित्रपटाची नोंद झाली आहे. हा चित्रपट १९५० साली प्रदर्शित झाला आहे. या पोलमध्ये जपानच्या सहापैकी एकाही समीक्षकाने मत दिले नाही. मात्र, अन्य सर्व देशांच्या समीक्षकांनी त्याला हमखास मते दिली.
फ्रेंचमधील २७ फिल्म्स
बीबीसीने निवडलेल्या १०० चित्रपटांच्या यादीत फ्रेंचमधील तब्बल २७ चित्रपट आहेत, तर इटालियन व मँडरिनमधील प्रत्येकी ११ चित्रपट आहेत. बीबीसीने २४ देशांतील १९ भाषांमध्ये चित्रपटनिर्मिती करणाऱ्या ६७ दिग्दर्शकांचे १०० चित्रपट निवडले आहेत. या सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांच्या यादीतील केवळ ४ चित्रपटांचे दिग्दर्शन महिलांनी केले आहे. प्रत्यक्षात पोलमध्ये महिला समीक्षकांचे प्रमाण ४५ टक्के होते, हे विशेष!