Plane Crash: कोलंबियात विमानाला भीषण अपघात, १५ जण ठार; मृतांमध्ये दोन राजकीय नेत्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 09:23 IST2026-01-29T09:20:33+5:302026-01-29T09:23:20+5:30
Colombia Plane Crash: कोलंबियातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. सॅटेना एअरलाइन्सचे एक व्यावसायिक विमान व्हेनेझुएला सीमेजवळील नॉर्टे दे सँटान्डर प्रांतात कोसळले असून, या अपघातात विमानातील सर्व १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Plane Crash: कोलंबियात विमानाला भीषण अपघात, १५ जण ठार; मृतांमध्ये दोन राजकीय नेत्यांचा समावेश
कोलंबिया आणि व्हेनेझुएलाच्या सीमेवर असलेल्या नॉर्टे दे सँटान्डर प्रांतात बुधवारी एक भीषण विमान अपघात झाला. 'सॅटेना एअरलाइन्स'चे एक विमान कोसळल्याने १५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कोलंबियाच्या संसदेचे एक विद्यमान सदस्य डायोजेनेस क्विंटेरो आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार कार्लोस साल्सेडो यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सॅटेना फ्लाइट ८८९५ या विमानाने बुधवारी दुपारी कुकुटा येथून ओकानासाठी उड्डाण केले. उड्डाणानंतर काही मिनिटांतच आणि ओकाना येथे लँडिंग होण्यापूर्वी, विमानाचा एटीसीशी असलेला संपर्क अचानक तुटला. विमान बेपत्ता झाल्याचे समजताच प्रशासनाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. काही तासांच्या शोधनंतर, दुर्गम डोंगराळ भागात विमानाचे अवशेष सापडले. या विमानात एकूण १३ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्स होते, या सर्वांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
या अपघातामध्ये कोलंबियाच्या राजकीय क्षेत्रातील दोन मोठ्या व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत. स्थानिक आमदार विल्मर कॅरिलो यांनी या घटनेला भयानक अपघात असे संबोधले असून जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हा अपघात व्हेनेझुएलाच्या सीमेजवळील अत्यंत दुर्गम, डोंगराळ आणि घनदाट जंगलात घडला. खराब हवामान आणि भौगोलिक रचनेमुळे बचाव पथकाला अवशेषांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित हवाई वाहतूक यंत्रणा आणि तपास संस्था या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.