पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 06:47 IST2025-11-03T06:46:09+5:302025-11-03T06:47:25+5:30
बेन ॲण्ड जेरीजचे सहसंस्थापक असलेल्या कोहेन यांनी आपण स्वतःच असे आइस्क्रीम बाजारात आणत असल्याचा निर्णय सोशल मीडियावरून जाहीर केला आहे.

पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी बेन कोहेन या सुप्रसिद्ध आइस्क्रीम उद्योजकाने कलिंगडाच्या स्वादाचे आइस्क्रीम तयार करण्याचा घाट घातला आहे. युनिलिव्हरची आइस्क्रीम कंपनी असलेल्या ‘बेन ॲण्ड जेरीज’ या प्रसिद्ध आइस्क्रीम ब्रँडने असे आइस्क्रीम तयार करण्याची कल्पना धुडकावल्यानंतर बेन ॲण्ड जेरीजचे सहसंस्थापक असलेल्या कोहेन यांनी आपण स्वतःच असे आइस्क्रीम बाजारात आणत असल्याचा निर्णय सोशल मीडियावरून जाहीर केला आहे.
‘जे त्यांना करायला जमलं नाही, ते मी करायचं ठरवलं आहे, मी एक कलिंगडाच्या स्वादाचं आइस्क्रीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आइस्क्रीम गाझा पट्टीतील नागरिकांप्रति सहवेदनेचं प्रतीक म्हणून मी तयार करत आहे. गाझातील नुकसान भरून काढणं आणि तिथे शांतता नांदावी या मागणीचा पुरस्कर्ता म्हणून मी हे पाऊल उचलत आहे’, असं कोहेन यांनी आपल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट केलं आहे.
बेन कोहेन हे बेन ॲण्ड जेरीज या ब्रँडचे सहसंस्थापक आहेत. हा ब्रँड युनिलिव्हरने विकत घेतला. युनिलिव्हरने असं आइस्क्रीम बाजारात आणण्यास नकार दिल्यामुळे ‘बेन्स बेस्ट’ या नावाने कोहेन हे आइस्क्रीम स्वतःच बाजारात आणणार आहेत. कलिंगडामध्ये हिरवा, लाल, काळा आणि पांढरा हे चार रंग असतात. पॅलेस्टाइनच्या राष्ट्रध्वजातही हे चार रंग आहेत. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत ‘कलिंगड’ हे पॅलेस्टिनी अस्मितेचं प्रतीक ठरलं आहे. म्हणूनच, कोहेन यांनी कलिंगडाच्या स्वादाचं आइस्क्रीम तयार करून पॅलेस्टाइनप्रति सहवेदना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची ही कृती म्हणजे खाद्य जगतातील केवळ एक प्रयोग नसून ‘आइस्क्रीम ॲक्टिव्हिजम’ म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
बेन कोहेन हे ज्यू असल्यामुळे त्यांची ही कृती अधिक महत्त्वाची आहे. कोहेन यांचा जन्म १९५१ मध्ये स्थलांतरित आई-वडिलांच्या पोटी न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन भागात झाला. १९६३ मध्ये बेन कोहेन यांना त्यांचा व्यावसायिक भागीदार जेरी ग्रीनफिल्ड भेटला. दोघांनी पेनसिल्वानिया विद्यापीठात ‘आइस्क्रीम मेकिंग’चा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. १९७८ मध्ये त्यांनी बेन ॲण्ड जेरीज आइस्क्रीम सुरू केलं. आवश्यक तेव्हा ठाम सामाजिक भूमिका घेणं ही या ब्रँडची खासियत ठरली. त्यालाच त्यांचा आइस्क्रीम ॲक्टिव्हिजम म्हणून ओळखलं जातं. हवामान बदलांपासून ते अनेक सामाजिक समस्यांवर त्यांनी वेळोवेळी भाष्य केलं आणि भूमिकाही घेतल्या.
ज्यू असून पॅलेस्टाइनच्या बाजूने इस्रायलच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात येत आहे. त्यावर उत्तरही त्यांनी स्वतःच दिले आहे. ‘मी ज्यू आहे. माझं कुटुंब ज्यू आहे,. माणसांना समानतेची वागणूक मिळावी असं मी मानतो, त्यामुळे मी अँटी इस्रायल किंवा अँटी ज्यू कसा ठरतो?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ‘आइस्क्रीमचं दुसरं नाव आनंद हे आहे! आनंद वाटला नाही तर त्यात काही मजा नाही आणि मला वाटतं, शांतता हा सगळ्यात उत्तम फ्लेव्हर आहे’, असं कोहेन यांनी पूर्वी म्हटलं आहे. आपल्या उक्तीला कृतीची जोड त्यांनी कलिंगडाच्या स्वादाच्या आइस्क्रीम निर्मितीतून दिली आहे.