केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 09:02 IST2025-07-20T08:51:20+5:302025-07-20T09:02:14+5:30
चिनी संशोधकांनी लावलेला शोध ३ जुलैच्या पीअर रिव्ह्यूएड जर्नल कॅन्सर सेल यात प्रकाशित झाला आहे.

केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
बीजिंग - सध्याच्या घडीला कॅन्सर या आजाराबाबत अनेकांच्या मनात धास्ती आहे. जागतिक स्तरावर कॅन्सरवर उपाय शोधण्याचे अनेक रिसर्च सुरू असतात. त्यातच चिनी संशोधकांनी केलेल्या रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅन्सरवरील उपचाराचा भाग म्हणून रुग्णांना केमोथेरेपी दिली जाते. मात्र याच केमोथेरेपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची शक्यता अधिक असते असा दावा या संशोधकांनी केला आहे. मूळ ट्यूमर असलेल्या जागेपासून इतर अवयवांमध्ये केमोथेरेपीमुळे कॅन्सर पसरू शकतो असा रिपोर्ट संशोधकांनी पुढे आणला आहे.
चिनी संशोधकांनी स्तनाच्या कॅन्सरवरील रुग्णांच्या उपचारांवर आधारित हा अभ्यास केला आहे. त्यामध्ये डॉक्सोर्युबिसिन (Doxorubicin) आणि सिस्प्लॅटिन (Cisplatin) ही केमोथेरपी औषधे दिल्यानंतर सुप्तावस्थेतील (Dormant) कॅन्सर पेशी जागृत झाल्या आणि त्यामुळे शरीरात फुफ्फुसांमध्ये मेटास्टेसिस सुरू होते. केमोथेरेपीमुळे शरीरातील सुप्तावस्थेतील कॅन्सर पेशी सक्रीय होतात आणि त्या इतर अवयवांमध्ये पसरतात. सध्या हा प्रयोग प्राण्यांवर केला जात आहे. त्याशिवाय काही मानवी रुग्णांवरही त्याची चाचणी सुरू आहे. चिनी संशोधकांनी लावलेला शोध ३ जुलैच्या पीअर रिव्ह्यूएड जर्नल कॅन्सर सेल यात प्रकाशित झाला आहे.
सध्या हे संशोधन प्राथमिक टप्प्यावर आहे. सर्व प्रकारच्या केमोथेरेपीसाठी हे लागू नाही. मात्र या शोधामुळे संशोधक कॅन्सरवर अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धती शोधू शकतील. त्याशिवाय भविष्यात Combination Therapies म्हणजेच केमोथेरेपीसोबत इतर औषधांचा वापर करून असा उपचार टाळण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. या स्टडी रिपोर्टमधून काही परिस्थितीत केमोथेरेपीचे उलट परिणाम होऊ शकतात असं प्राथमिक निष्कर्ष काढले जाऊ शकतात.
रुग्णांनी काय करावे?
चिनी संशोधकांनी लावलेला हा शोध अगदी प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाऊ नये किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता उपचार थांबवू नयेत असा सल्ला संशोधकांनी दिला आहे. आजही केमोथेरेपी अनेक प्रकारच्या कॅन्सरवर प्रभावी आणि जीवनवाचक उपचार ठरते. त्यामुळे नवीन आलेल्या या स्टडीचे पूर्णपणे निष्कर्ष सिद्ध होईपर्यंत कुणीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेणे गरजेचे आहे.