“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 10:23 IST2025-05-07T10:14:34+5:302025-05-07T10:23:19+5:30
Operation Sindoor Surgical Air Strike: सध्याच्या परिस्थितीबद्दल आम्हाला चिंता आहे, असे चीनने म्हटले आहे.

“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
Operation Sindoor Surgical Air Strike: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तावर कठोर कारवाई करत या हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी जनभावना होती. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करून प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणी एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. यानंतर आता अनेक देशांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही देशांनी या कारवाईबाबत भारताला पाठिंबा दिला आहे. तर चीनकडून ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत भाष्य करताना खेद व्यक्त करण्यात आला आहे.
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढत असतानाच भारताने मंगळवारी मध्यरात्री दीडनंतर पाकिस्तानवर हल्लाबोल केला. भारताने सीमेवरून पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्रे डागली, असे पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, ही क्षेपणास्त्रे पाकव्याप्त काश्मीर आणि देशाच्या पूर्व पंजाब प्रांतात डागण्यात आली. पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले, भारताने बुधवारी पहाटे हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना आम्ही प्रत्युतर देऊ. ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिली.
भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ७ मे रोजी पहाटे भारताने पाकिस्तानमधील ठिकाणांवर लष्करी हल्ले केले, ज्याला पाकिस्तानकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले. चीनचे काय म्हणणे आहे? या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले की, आज सकाळी भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक आहे, असे चीनला वाटते. सध्याच्या परिस्थितीबद्दल आम्हाला चिंता आहे. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत आणि नेहमीच राहतील. भारत आणि पाकिस्तान चीनचेही शेजारी देश आहेत. सर्व प्रकारच्या दहशतवादाला चीन विरोध करतो. शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित व्हावे, यासाठी व्यापक हिताची कृती करण्याचे, संयम बाळगण्याचे तसेच परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होणार नाही, याची काळजी घेण्याचे दोन्ही देशांना आवाहन करतो, असे चीनने म्हटले आहे.
दरम्यान, इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी एक्सवर पोस्ट करत भारताला खुले समर्थन दिले आहे. राजदूत रुवेन अझर आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात की, भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे इस्रायल समर्थन करतो. निरपराध लोकांवर केलेल्या भयंकर हल्ल्यानंतर लपण्यासाठी कुठेही स्थान मिळणार नाही, याचा धडा दहशतवाद्यांना मिळालाच पाहिजे, असे अझर यांनी म्हटले आहे.
"China finds India’s military operation early this morning regrettable. We are concerned about the ongoing situation. India and Pakistan are and will always be each other’s neighbours. They’re both China’s neighbours as well. China opposes all forms of terrorism. We urge both… pic.twitter.com/b8jLybfCPN
— ANI (@ANI) May 7, 2025