"कॅनडाला चीन एका वर्षात गिळंकृत करेल"; गोल्डन डोमवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्क कार्नींना थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 09:12 IST2026-01-24T09:11:59+5:302026-01-24T09:12:51+5:30
ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे आता उत्तर अमेरिकेतील दोन मित्र राष्ट्रांमधील तणाव जागतिक चर्चेचा विषय ठरला आहे.

"कॅनडाला चीन एका वर्षात गिळंकृत करेल"; गोल्डन डोमवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्क कार्नींना थेट इशारा
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यातील संबंध आता टोकाला पोहोचले आहेत. ग्रीनलँडमधील अमेरिकेचा प्रस्तावित गोल्डन डोम मिसाइल डिफेन्स प्रोजेक्ट आणि कॅनडाची चीनसोबतची वाढती जवळीक यावरून ट्रम्प यांनी कॅनडाला कडक शब्दांत फटकारले आहे. "जर कॅनडाने अमेरिकेच्या सुरक्षा कवच ऐवजी चीनचा हात धरला, तर चीन एका वर्षात त्यांना गिळून टाकेल," अशा शब्दात ट्रम्प यांनी इशारा दिला आहे.
काय आहे 'गोल्डन डोम' वाद?
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ग्रीनलँडमध्ये गोल्डन डोम ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली उभारण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प यांच्या मते, ही यंत्रणा केवळ अमेरिकेचेच नव्हे तर कॅनडाचेही रक्षण करेल. मात्र, कॅनडासह काही युरोपीय देशांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. याच मुद्द्यावरून ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत ट्रुथ सोशलवर प्रतिक्रिया दिली. "गोल्डन डोम कॅनडाचे रक्षण करणार आहे, तरीही ते याला विरोध करत आहेत आणि चीनसोबत व्यापार करण्याला प्राधान्य देत आहेत जे पहिल्या वर्षातच त्यांना गिळंकृत करेल," असं ट्रम्प यांनी म्हटलं.
दावोसमध्ये रंगले वाकयुद्ध
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ५६ व्या वार्षिक शिखर परिषदेत ट्रम्प यांनी पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यावर जोरदार टीका केली. ट्रम्प म्हणाले की, "कॅनडाला अमेरिकेकडून अनेक गोष्टी मोफत मिळतात. त्यांनी आमचे आभारी असायला हवे, पण तसे दिसत नाही. काल मी तुमच्या पंतप्रधानांना पाहिले, ते अजिबात कृतज्ञ नव्हते. मार्क, पुढच्या वेळी विधान करताना लक्षात ठेवा की कॅनडाचे अस्तित्व अमेरिकेमुळे आहे."
चीन-कॅनडा व्यापार करार ठरला ठिणगी
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी १७ जानेवारी रोजी चीनसोबत ७ अब्ज डॉलरच्या नवीन व्यापार कराराची घोषणा केली. या करारामुळे कॅनडातील व्यवसाय आणि कामगारांसाठी मोठी बाजारपेठ खुली होईल, असा दावा कार्नी यांनी केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी चीनला अमेरिकेपेक्षा अधिक विश्वासू भागीदार असल्याचेही सुचवले आहे. कॅनडाचे हे चीन प्रेम पाहून ट्रम्प भडकले असून त्यांनी कॅनडाला धोक्याची सूचना दिली आहे.