चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:57 IST2025-07-21T13:56:29+5:302025-07-21T13:57:56+5:30

हे धरण अरुणाचल प्रदेशजवळील तिबेटमधील न्यिंगची शहरात बांधण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी ब्रह्मपुत्र नदी यू-टर्न घेते आणि अरुणाचल प्रदेशमार्गे बांगलादेशला जाते.

China starts construction of largest dam on Brahmaputra river India has already objected | चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप

चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप

चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात करत आहे. हे धरण ब्रह्मपुत्र नदीवर बांधण्यात येणार आहे. या धरणाचे नाव यारलुंग झांगबो आहे. हे धरण बांधण्यासाठी १६७.८ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच १ लाख ४४ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. पण, हे धरण बांधायला सुरुवात करण्याआधीच भारताने आक्षेप घेतला आहे. 

झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार

अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळच हे धरण होणार आहे. यामुळे खालील गावांना याचा फटका बसू शकतो. खाली असणाऱ्या गावांना पुराचा धोका होऊ शकतो. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या धरणावर आक्षेप घेतला आहे. भारताने चीनला ब्रह्मपुत्रेवर असे कोणतेही काम करू नये असे सांगितले होते, यामुळे खालच्या भागात राहणाऱ्या लोकसंख्येचे नुकसान होईल. त्यानंतर चीनची बाजूही समोर आली. चीनने म्हटले होते की, या प्रकल्पामुळे खालच्या भागातील देशांचे कोणतेही नुकसान होणार नाही. ते या धरणाबद्दल इतर देशांशी चर्चा करत राहतील. यापूर्वी १८ डिसेंबर २०२४ रोजी एनएसए अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात पाण्याबाबत चर्चा झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, चीन एक जलविद्युत प्रकल्प बांधत आहे. त्याची पायाभरणी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी शनिवारी, १९ जुलै रोजी केली. अरुणाचल प्रदेशजवळील तिबेटमधील न्यिंगची शहरात हे धरण बांधले जाणार आहे. तिथे ब्रह्मपुत्र नदी एक मोठा यू-टर्न घेते आणि अरुणाचल प्रदेशमार्गे बांगलादेशला जाते.

या जलविद्युत प्रकल्पात पाच कॅस्केड पॉवर स्टेशन असतील. यामुळे दरवर्षी ३०० अब्ज किलोवॅट-तासांपेक्षा जास्त वीज निर्मिती होईल. दरवर्षी ३० कोटी लोकांना वीज पुरवली जाईल. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावर बांधकाम सुरू झाले आहे.

सीमावर्ती भागात पूरसदृश परिस्थिती 

चीनच्या या प्रकल्पामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी हे धरण बांधले जात आहे त्या भागात अनेकदा भूकंप होतात. धरण बांधल्याने परिसंस्थेवर दबाव येऊ शकतो. यामुळे मोठे अपघात होऊ शकतात. याशिवाय ब्रह्मपुत्र नदीच्या पाण्यावर चीनचे नियंत्रण असेल. यामुळे बीजिंगसह इतर शहरांना पाणीपुरवठा करण्यास मदत होईल. तसेच जर या धरणातून एकाच वेळी पाणी सोडले तर सीमावर्ती भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही आक्षेप घेतला होता. त्यांनी चीनच्या या धरणाला 'वॉटर बॉम्ब' म्हटले होते. 'हा प्रकल्प केवळ पर्यावरण किंवा जल सुरक्षेचा विषय नाही. तर तो भारतासाठी अस्तित्वाचा धोका आहे. यामुळे लष्करी धोका निर्माण होईल', असा त्यांनी इशारा दिला होता. 

सीमाभागाजवळ राहणाऱ्या आदिवासींचे जीवन आणि संसाधने उद्ध्वस्त होतील. कारण भविष्यात चीन या धरणाचा वापर शस्त्र म्हणून करू शकतो, असंही त्यांनी म्हटले होते. 

Web Title: China starts construction of largest dam on Brahmaputra river India has already objected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.