श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 16:38 IST2024-07-07T16:38:22+5:302024-07-07T16:38:43+5:30
Indian Ocean Tensions : अद्याप या निर्णयावर भारत सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.

श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार...
China Spy Ship : चिनी गुप्तहेर जहाज वारंवार श्रीलंकेत येण्याचा प्रयत्न करायचे, ज्यामुळे श्रीलंकन सरकारने त्यावर बंदी घातली होती. पण, आता ही बंदी उठवण्याचा निर्णय तेथील सरकारनेय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भारताची डोकेदुखा नक्की वाढणार आहे. जपानी मीडियानुसार, श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी, यांनी बंदी उठवण्याच्या निर्णयाची माहिती 'NHK World Japan' ला दिली आहे.
भारताच्या विनंतीनंतर बंदी घातलेली
भारत सरकारने हिंद महासागरात चिनी संशोधन जहाजांच्या वाढत्या हालचालींबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच, ती हेरगिरी जहाजे असल्याचा संशय व्यक्त करत, अशा जहाजांना आपल्या बंदरांवर येऊ देऊ नये, असे आवाहन श्रीलंकेला केले होते. भारताच्या विनंतीनंतर श्रीलंकेने जानेवारीमध्ये परदेशी संशोधन जहाजांना आपल्या बंदरावर येण्यास बंदी घातली. पण, आता ही बंदी उठवण्यात आली आहे.
साबरी म्हणाले की, आम्हाला इतरांच्या वादात पडायचे नाही. त्यामळे श्रीलंका पुढील वर्षापासून आपल्या बंदरांवर परदेशी संशोधन जहाजांना येण्यावर बंदी घालणार नाही. विशेष म्हणजे, यापूर्वीही दोन चिनी जहाजांना श्रीलंकेच्या बंदरांवर येण्याची परवानगी देण्यात आली होती. चीनी संशोधन जहाज शि यान 6 ऑक्टोबर 2023 रोजी श्रीलंकेत थांबले होते. ते येण्यापूर्वी अमेरिकेने श्रीलंकेकडे चिंता व्यक्त केली होती. तर, ऑगस्ट 2022 मध्येही चीनी नौदल जहाज युआन वांग 5 दक्षिण श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरावर आले होते.