घटस्फोट हवा? मग पत्नीनं केलेल्या घरकामाची भरपाई दे; न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 14:09 IST2021-02-25T14:08:57+5:302021-02-25T14:09:13+5:30
बीजिंगमधील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; पत्नीनं केलेल्या घरकामाची भरपाई म्हणून ५० हजार युवान देण्याचे आदेश

घटस्फोट हवा? मग पत्नीनं केलेल्या घरकामाची भरपाई दे; न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
नवी दिल्ली: घटस्फोटानंतर पत्नीला पतीकडून पोटगी मिळते, अशी तरतूद आपल्या देशाच्या कायद्यात आहे. पत्नीला गुजराण करता यावी यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पतीला घटस्फोटानंतर पत्नीला महिन्याकाठी एक ठराविक रक्कम द्यावी लागते. मात्र चीनमध्ये एका व्यक्तीला पत्नीला घरात केलेल्या कामाची भरपाईदेखील द्यावी लागणार आहे. बीजिंगमधल्या न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, घटस्फोटानंतर महिलेला ५० हजार युवान (५.६ लाख रुपये) मिळतील. पाच वर्षांच्या संसारात घरात केलेल्या कामाचं मूल्य म्हणून महिलेला ही रक्कम मिळेल. घटस्फोटानंतर महिलांना त्यांनी संसारात केलेल्या कामाची भरपाई देणारा कायदा चीन सरकारनं केला आहे. महिला संसार करताना मुलांना वाढवतात, ज्येष्ठांची देखभाल करतात, पतीला त्यांच्या कामांत मदत करतात. याची भरपाई त्यांना घटस्फोटानंतर मिळायला हवी, असं चीनचा नवा कायदा सांगतो.
बीजिंगच्या न्यायालयात गेल्या वर्षी चेन नावाच्या व्यक्तीनं घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. पत्नी वँगपासून घटस्फोट मिळावा यासाठी चेन यांनी अर्ज केला होता. चेन आणि वँग २०१५ मध्ये विवाह बंधनात अडकले. मात्र वाद होत असल्यानं ते २०१८ पासून वेगळे राहत आहेत. वँग यांनी सुरुवातीला घटस्फोटास नकार दिला. पण संसार सुरू असताना पती घरकामात मदत करत नसल्यानं, मुलांकडे दुर्लक्ष करत असल्यानं तिनं आर्थिक मदत मागितली.
बीजिंगमधल्या फँगशॅन न्यायालयानं वँगच्या बाजूनं निर्णय दिला. चेन यांनी वँगला महिन्याकाठी २ हजार युवानची पोटगी द्यावी. यासोबतच संसार सुरू असताना तिनं केलेल्या कामाची भरपाई म्हणून ५० हजार युवान अतिरिक्त द्यावेत, असा आदेश न्यायालयानं दिला. दाम्पत्य विवाह बंधनात असलेला काळ, वँगनं घरात केलेली कामं, चेनचा उत्पन्न आणि उदरनिर्वाहासाठी त्या भागात येत असलेला खर्च यांचा विचार करून ५० हजार युवान ही रक्कम निश्चित करण्यात आली.