अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:54 IST2026-04-07T18:53:21+5:302026-04-07T18:54:38+5:30
Iran War Impact on China: मिडल ईस्टमध्ये युद्ध सुरू असताना चीनची ऊर्जा सुरक्षा मजबूत का आहे? तेलाचा साठा, इलेक्ट्रिक वाहने आणि कोळशापासून केमिकल निर्मिती

अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि अमेरिका-इराण युद्धामुळे जगावर ऊर्जा संकटाचे सावट असताना चीन मात्र मोठ्या प्रमाणात सुरक्षित दिसत आहे. जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश असूनही, चीनने गेल्या २० वर्षांपासून राबवलेल्या दूरगामी धोरणांमुळे आज त्यांच्यावर या युद्धाचा परिणाम इतर देशांच्या तुलनेत कमी होत आहे.
चीनने २००४ पासूनच 'इमर्जन्सी ऑईल रिझर्व्ह' बनवण्यास सुरुवात केली होती. मलक्का सामुद्रधुनीसारख्या मार्गांवरून होणारा पुरवठा भविष्यात विस्कळीत होऊ शकतो, हे ओळखून चीनने मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा साठा करून ठेवला आहे. त्यामुळे सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीतही चीनकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे.
चीन आता पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांवरून वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्पांमध्ये चीनने केलेली अफाट गुंतवणूक आता फळाला येत आहे. यामुळे तेलावरील त्यांची अवलंबित्व हळूहळू कमी होत आहे.
कोळशापासून केमिकल निर्मितीचे तंत्र
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने वापरलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून चीनने आता कोळशापासून मेथेनॉल आणि सिंथेटिक अमोनिया यांसारखी महत्त्वाची रसायने बनवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्लास्टिक आणि रबर उद्योगासाठी त्यांना परदेशातून येणाऱ्या तेलावर अवलंबून राहावे लागत नाही.
जगाचे चीनवर वाढते अवलंबित्व
आज व्हिएतनाम आणि फिलीपिन्ससारखे देश ऊर्जा संकटात चीनकडे मदतीची याचना करत आहेत. जगातील पाऊण हिस्सा पॉलिस्टर आणि नायलॉन आजही चीनमध्येच बनते. मात्र, एवढे असूनही चीन अजूनही आपल्या गरजेच्या ७५% तेल आयात करतो, हीच त्यांची एकमेव कमकुवत बाजू आहे.