“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:35 IST2025-10-12T11:34:02+5:302025-10-12T11:35:21+5:30
China Replied America On Additional Trump Tariff: ट्रम्प यांच्या अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लादण्याच्या निर्णायवर चीनने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली असून, देशाचे हितसंबंध जपण्यासाठी मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा दिला आहे.

“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
China Replied America On Additional Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कृतींमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील हितसंबंधांना गंभीर नुकसान होत आहे. द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापार चर्चेसाठीचे वातावरण बिघडत आहे. चीन लढू इच्छित नाही, परंतु लढण्यास घाबरत नाही आणि गरज पडल्यास तो प्रत्युत्तर देईल, या शब्दांत चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने १०० टक्के टॅरिफ लदण्याच्या निर्णयावर हल्लाबोल केला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून येणाऱ्या सर्व आयातींवर अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. हा निर्णय १ नोव्हेंबरपासून किंवा त्यापूर्वीच लागू होऊ शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनने दुर्मीळ धातूंच्या निर्यातीवर नवीन नियंत्रण घातल्यामुळे ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला होता. चीनच्या या नियंत्रणांमुळे ते जगाला ओलीस ठेवत आहे, असा आरोप त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला होता. यानंतर आता चीनकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले आहे.
अमेरिकेने त्यांचे निर्णय त्वरित दुरूस्त करावेत
अमेरिकेने चीनवर वारंवार नवीन निर्बंध लादले आहेत. निर्यात नियंत्रण आणि प्रतिबंधित यादीत अनेक चिनी कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येकवेळी उच्च शुल्क लादण्याची धमकी देणे, हा चीनशी वाटाघाटी करण्याचा योग्य मार्ग नाही. आम्ही अमेरिकेला त्यांचे चुकीचे निर्णय त्वरित दुरूस्त करण्याचे आणि दोन्ही देशांमध्ये स्थिर, विकासात्मक आर्थिक व्यापार संबंध राखण्याचे आवाहन करतो, असे चीनने स्पष्ट केले आहे.
...तर देशाचे हितसंबंध जपण्यासाठी चीन मागेपुढे पाहणार नाही
अमेरिकेशी संबंधित जहाजांवर विशेष बंदर शुल्क आकारले जाईल. अमेरिकेच्या नवीन शुल्कांवर प्रतिक्रिया म्हणून हे पाऊल आवश्यक असल्याचे चीनने म्हटले आहे. जर अमेरिका आपल्या भूमिकेवर कायम राहिला, तर चीन आपले कायदेशीर हक्क आणि हितसंबंध जपण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मंत्रालयाने दिला आहे.
दरम्यान, ट्रम्प हे दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर जात असून त्या दरम्यान ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार होते. आता जिनपिंग यांच्यासोबत चर्चा होईल का याची माहिती नाही, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे.