चीन व्हेनेझुएलाच्या पाठीशी, किम जोंग यांनी दिली थेट युद्धाची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:22 IST2026-01-05T12:21:44+5:302026-01-05T12:22:23+5:30
राष्ट्राध्यक्ष मादुरोंना मुक्त करा; चीनची मागणी, ही दादागिरी, सार्वभौम देशावरील हल्ला गंभीर : जोंग

चीन व्हेनेझुएलाच्या पाठीशी, किम जोंग यांनी दिली थेट युद्धाची धमकी
बीजिंग : इंधन तेलाने समृद्ध व्हेनेझुएलावर मध्यरात्री अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर या देशाची बाजू घेण्यासाठी चीन आणि उत्तर कोरिया हे देश सरसावले आहेत. अमेरिकेच्या ताब्यात असलेले व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नी सीलिया फ्लोरेस यांची तत्काळ मुक्तता करण्याची मागणी चीनने केली आहे. तर, उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग यांनी ही अमेरिकेची गुंडगिरी असल्याचे सांगत एका सार्वभौम देशावर केलेला हा सर्वांत गंभीर हल्ला असल्याचे म्हटले आहे.
कोणताही वाद असला तरी त्यावर तोडगा हा चर्चेच्या माध्यमातूनच काढला जावा, असे चीनने म्हटले आहे. एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पकडून आपल्या देशात नेणे सर्वस्वी चुकीचे असल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो आपले खास मित्र असल्याचे सांगत जोंग यांनी थेट ट्रम्प यांना जागतिक युद्धाची धमकी दिली आहे.
व्हेनेझुएलात आता सत्ता कुणाची?
अमेरिकी सैनिकांनी राष्ट्राध्यक्ष मादुरो व त्यांच्या पत्नीला पकडून अमेरिकेत नेल्यानंतर या देशात नेमकी सत्ता कुणाची, याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. २.९ कोटी लोकसंख्येच्या या देशात मादुरोंच्याविरुद्ध अनेकदा बंड झाले होते.
रोड्रिगेज राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत
२०१८ पासून देशाचे उपराष्ट्रपतिपद सांभाळत असलेल्या डेल्सी रोड्रिगेज आता राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असून व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना तात्पुरती राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याचे आदेश दिले आहेत.
संविधान काय सांगते?
व्हेनेझुएलातील संविधानात असलेल्या तरतुदींनुसार राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थितीत कोणत्याही परिस्थितीत देशात एक महिन्याच्या आत सार्वत्रिक निवडणूक झाली पाहिजे. शिवाय रोड्रिगेज यांचे अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रिट’शी संबंधित रिपब्लिकन नेत्यांशी असलेले संबंध पाहता निवडणुकीत त्यांचे पारडे जड ठरत आहे.
जगभर तीव्र प्रतिक्रिया
अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याच्या तीव्र प्रतिक्रिया जगभर उमटल्या आहेत. चीनने राष्ट्राध्यक्ष मादुरो व त्यांच्या पत्नीची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी केली आहे. हा प्रकार संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदीमध्ये नमूद तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे चीनने म्हटले आहे. उत्तर कोरियाने हा प्रकार अमेरिकेची दादागिरी असल्याचे म्हटले.
विरोधी पक्षनेत्यांवरही लक्ष
व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या आणि गेल्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो यांच्यावरही आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकांचे लक्ष आहे. मात्र, देश चालवण्यासाठी आवश्यक पुरेसे पाठबळ मारिया कोरिना मचाडो यांच्याकडे नसल्याने मोठी
अडचण आहे.
हे एक धोकादायक
अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्याविरुद्ध झालेल्या कारवाईबद्दल दक्षिण फ्लोरिडामध्ये आनंदोत्सव साजरा केला. न्यूयॉर्क शहराचे महापौर जोरान ममदानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोन चर्चा करून हे थेट युद्धकृत्य असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उल्लंघन आहे, असे डावे पक्षांनी म्हटले आहे.
भारताने व्यक्त केली चिंता, घडामोडींकडे बारीक लक्ष
भारताने या घटनाक्रमाबाबत तीव्र चिंता व्यक्त करून या घडामोडींकडे बारीक लक्ष असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने व्हेनेझुएलातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण समर्थन असल्याचे नमूद करून हा वाद शांततेच्या मार्गाने चर्चेतून सोडवला जावा, असे आवाहन केले आहे.
काँग्रेसने या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करून आंतरराष्ट्रीय कायद्याने स्थापित सिद्धांतांचे एकतर्फी कारवाईतून उल्लंघन केले जाऊ शकत नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे. अमेरिकेचा हा हल्ला म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या संहितेचे गंभीर उल्लंघन असल्याचे भारतातील डाव्या पक्षांनी म्हटले आहे.