अतिरेक्यांची मुलं ‘गुपचूप’ ब्रिटनमध्ये; मुलं ‘दहशतवादी’ होण्याची भीती! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 06:03 AM2023-12-08T06:03:48+5:302023-12-08T06:04:05+5:30

मुळात इसिस जन्माला कशी आली, याचा आधी विचार करावा लागेल. सद्दाम हुसेननं इराकवर अनेक वर्षे अक्षरश: एकहाती सत्ता गाजवली

Children of terrorists 'secretly' in Britain; Fear of children becoming 'terrorists'! | अतिरेक्यांची मुलं ‘गुपचूप’ ब्रिटनमध्ये; मुलं ‘दहशतवादी’ होण्याची भीती! 

अतिरेक्यांची मुलं ‘गुपचूप’ ब्रिटनमध्ये; मुलं ‘दहशतवादी’ होण्याची भीती! 

एक काळ होता, जेव्हा इसिस ही अतिरेकी संघटना खूप चर्चेत होती. या संघटनेत सामील होण्यासाठी जगभरातून तरुण आणि तरुणी उत्सुक होते आणि या संघटनेत सामील होण्यासाठी ते इराक आणि सिरीयामध्येही जात होते. त्यामुळे अनेक देश हादरले होते. आपल्या देशातील तरुण पिढी दहशतवादाच्या मार्गानं गेली तर काय, असा प्रश्न सगळ्यांच्याच पुढे उभा होता. कालांतरानं या संघटनेचा खात्मा झाला आणि हा प्रश्न जवळपास निकाली निघाला; पण त्यामुळे निर्माण झालेले काही प्रश्न आजही डोक्यावर फेर धरून आहेत. 

मुळात इसिस जन्माला कशी आली, याचा आधी विचार करावा लागेल. सद्दाम हुसेननं इराकवर अनेक वर्षे अक्षरश: एकहाती सत्ता गाजवली. २००६मध्ये अमेरिकेनं सद्दामला संपवलं आणि इराकला त्याच्या तावडीतून मुक्त केलं; पण तोपर्यंत इराक अक्षरश: बरबाद झाला होता. अमेरिकेनं इराक सोडताच तिथले छोटे- मोठे गट पुन्हा सक्रिय झाले आणि त्यांच्यात वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली. त्यातला एक गट होता अबू बकर अल बगदादी याचा. इराकच्या अल कायदाचा मुख्य. मात्र, त्यावेळी त्याच्याकडे ना पैसा होता, ना फारसे साथीदार. इराकमध्ये त्याच्या अतिरेकी संघटनेला फारसं यश मिळत नाहीए हे पाहिल्यावर त्यानं गृहयुद्ध सुरू असलेल्या सिरीयाकडे आपली नजर वळवली. आपल्या संघटनेचं नावही त्यानं बदलून ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक ॲण्ड सिरीया’ (इसिस) असं केलं. 

जून २०१३मध्ये सिरीयन आर्मीच्या लष्करप्रमुखानं जाहीरपणे सांगितलं, आम्हाला जर हत्यारं मिळाली नाहीत, तर एक महिन्याच्या आत आम्ही बंडखोरांविरुद्धचं हे युद्ध हरून जाऊ! त्यांच्या आवाहनानंतर एक आठवड्याच्या आतच अमेरिका, इस्रायल, सौदी अरब, कतार, जॉर्डन.. इत्यादी अनेक देशांनी सिरीयाला पैसे आणि हत्यारांची मदत पोहोचवली. त्याचबरोबर हत्यारं आणि संरक्षणाबाबतचं ट्रेनिंगही त्यांना दिलं. इसिससाठी ही सुवर्णसंधी होती. ‘फ्रीडम फायटर्स’च्या नावाखाली इसिसच्या अतिरेक्यांनी याबाबतचं सारं ‘अधिकृत’ प्रशिक्षणही घेतलं आणि थोड्याच कालावधीत जगभरातून आलेल्या या शस्त्रास्त्रांवर ताबाही मिळवला! अमेरिका आणि इस्रायलचा छुपा पाठिंबाही त्यांनी मिळवला. त्याचवेळी जगभरात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. देशोदेशीचे तरुण त्याला भुलले आणि इसिसमध्ये सामील होण्यासाठी त्यांनी इराक आणि सिरीयाकडे जाण्यासाठी आपला मोर्चा वळवला. यात अनेक सुशिक्षित तरुणांचाही भरणा होता. 

विशेष म्हणजे, जगभरातल्या हजारो तरुणीही या अतिरेक्यांशी लग्न करण्यासाठी नुसत्या राजीच झाल्या नाहीत, तर इराक आणि सिरीयाकडे जाण्यासाठी त्यांचीही रीघ लागली. २०१४ पर्यंत ही संघटना अतिशय बलवान आणि त्याच वेळी सगळ्याच देशांच्या फारच डोईजड झाली होती. डोक्यावरून पाणी जायला लागल्यानं इसिसचा बंदाबस्त करणं त्यांच्यासाठी गरजेचं झालं होतं. त्यामुळे अमेरिकेसह अनेक देशांनी एकत्र येऊन या संघटनेला जवळपास संपवलं; पण या अतिरेक्यांशी लग्न करायला म्हणून ज्या तरुणी सिरीयामध्ये आल्या होत्या, त्यांचा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. या युद्धात बऱ्याचशा तरुणी मारल्या गेल्या किंवा सिरीयातील निर्वासितांच्या छावणीत त्या आपल्या मुलांसह अजूनही बंदिस्त आहेत. ज्या ज्या देशांतील या तरुणी होत्या, त्यातल्या बऱ्याचशा तरुणी, स्त्रिया आणि त्यांच्या मुलांना त्या त्या देशांनी पुन्हा आपापल्या देशात आसरा दिला; पण ब्रिटननं मात्र त्याबाबत अगदी आतापर्यंत अगदी कडक धोरण अवलंबलं आहे. त्यांनी ना या महिलांना पुन्हा आपल्या देशात घेतलं ना त्यांच्या मुलांना! 

आता मात्र ब्रिटननं याबाबत आपलं धोरण थोडं मवाळ केल्याचं दिसतं आहे. इसिसमध्ये सामील होण्यासाठी किंवा इसिसच्या अतिरेक्यांशी लग्न करायला सिरीयात गेलेल्या या महिलांना परत आपल्या देशात घेण्यास ते राजी नसले तरी त्यांच्या मुलांना मात्र ते आता ‘गुपचुप’ ब्रिटनमध्ये घेऊन जात असल्याची माहिती आहे. या मुलांना प्रथम अनाथालयात ठेवलं जाईल आणि त्यानंतर त्यांना दत्तक दिलं जाईल. 

मुलं ‘दहशतवादी’ होण्याची भीती! 
मानवाधिकार संघटनेचंही याबाबत म्हणणं आहे, ज्या परिस्थितीत या महिला आणि विशेषत: त्यांची मुलं निर्वासित छावण्यांमध्ये राहात आहेत, ते अतिशय धोकादायक आहे. ज्या पद्धतीचं आयुष्य ते जगत आहेत, ते पाहता ही मुलं भविष्यात दहशतवादाच्याच रस्त्यानं जाण्याची शक्यताही खूपच अधिक आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिक जबाबदारीनं सोडवण्याची आवश्यकता आहे. या छावण्यांमध्ये कायम साथीच्या आजारांनी थैमान घातलेलं असतं ते वेगळंच!

Web Title: Children of terrorists 'secretly' in Britain; Fear of children becoming 'terrorists'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.