युद्धविराम चर्चा निष्फळ; होर्मुझची नाकेबंदी करण्याचे ट्रम्पचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 08:21 IST2026-04-13T08:20:13+5:302026-04-13T08:21:52+5:30
Ceasefire talks fail: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये इराणबरोबरची शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणवर हल्ले करण्याचे पुन्हा संकेत दिले आहेत. इराण आपल्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षा सोडण्यास तयार नसल्यामुळे इस्लामाबादमधील चर्चा अयशस्वी झाल्याचे ट्रम्प म्हणाले.

युद्धविराम चर्चा निष्फळ; होर्मुझची नाकेबंदी करण्याचे ट्रम्पचे आदेश
वॉशिंग्टन - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये इराणबरोबरची शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणवर हल्ले करण्याचे पुन्हा संकेत दिले आहेत. इराण आपल्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षा सोडण्यास तयार नसल्यामुळे इस्लामाबादमधील चर्चा अयशस्वी झाल्याचे ट्रम्प म्हणाले.
त्याचबरोबर 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'त प्रवेश करणाऱ्या किंवा तिथून बाहेर पडणाऱ्या सर्व जहाजांची अमेरिका 'पूर्णपणे नाकेबंदी' करणार असून, ही नाकेबंदी लवकरच सुरू होईल, अशीही घोषणा ट्रम्प यांनी केली. आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका सविस्तर पोस्टमध्ये ट्रम्प यांनी ही नाकेबंदी केवळ इराणपुरती मर्यादित न ठेवता ती व्यापार करणाऱ्या इतर जहाजांनाही लागू केली आहे.
ते म्हणाले की, होर्मुझमध्ये सागरी क्षेत्रात ज्या जहाजांनी इराणला 'टोल' (कर) दिला आहे, अशा प्रत्येक जहाजाला अडवण्याचे आणि त्यांची तपासणी करण्याचे आदेश अमेरिकेच्या नौदलाला देण्यात आले आहेत. जो कोणी इराणला बेकायदा कर देईल, त्याला समुद्रात सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.
२१ तासांची चर्चा निष्फळ; उभय पक्षांचे दोषारोप
इस्लामाबादमध्ये शनिवारी सुरू झालेली इराण-अमेरिका ऐतिहासिक चर्चा २१ तास सुरू होती. पण, त्यातून तोडगा न निघाल्याने अखेर निष्फळ ठरली. या वाटाघाटी फिस्कटल्याबद्दल इराण व अमेरिकेने एकमेकांना जबाबदार धरले आहे. अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी, अमेरिकेने आपली अखेरची आणि सर्वोत्तम ऑफर देऊनही इराणने युद्धाच्या अटी मान्य केल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली.
दुसरीकडे, इराणचे प्रतिनिधी आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कालिबाफ यांनी, आमचा विश्वास जिंकायचा की नाही, हे आता अमेरिकेने ठरवायचे आहे, असे वक्तव्य केले. त्यांनी वाटाघाटी फिस्कटण्यामागे अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप केला, तर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेवर बेकायदा आणि अवास्तव मागण्या लादल्याचा आरोप केला.
पेरलेले पाणसुरुंग शोधून नष्ट करू
होर्मुझमध्ये इराणने पेरलेले पाणसुरूंग आमते नौदल शोधून ते नष्ट करेल. यात कोणीही इराणी नागरिक किंवा सैनिक आमच्यावर किंवा शांततेत प्रवास करणाऱ्या जहाजांवर गोळीबार करेल, त्याला थेट नरकात धाडू, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली.
इराणी जनतेत संताप, बंडखोरीची प्रतिक्रिया
तेहरान : अमेरिकेशी शांतता चर्चा निष्फळ ठरल्याने रविवारी सामान्य इराणी नागरिकांमध्ये निराशा आणि बंडखोरीची संमिश्र प्रतिक्रिया उमटली. आम्ही युद्धविरोधी, पण आत्मसमर्पण करणार नाही, अशी फरहाद या नागरिकाने प्रतिक्रिया दिली.
पुतिन यांची एन्ट्री; वादात मध्यस्थीची तयारी
मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या वादात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. पुतिन यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून चर्चा करून ही भूमिका मांडली. क्रेमलिनने (रशियन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान) दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी मध्य पूर्वेमध्ये न्याय्य आणि शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण तयार आहोत, यावर भर दिला, असे म्हटले आहे.
‘चीनने इराणला मदत केल्यास ५० टक्के टॅरिफ’
ट्रम्प यांनी चीनने इराणला कोणतीही लष्करी मदत पुरवली, तर त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात नवीन आयात शुल्क लादण्याचा इशारा दिला. 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, जर आम्हाला असे आढळले की चीन इराणला मदत करत आहे, तर आम्ही त्यांच्याकडून येणाऱ्या मालावर ५० टक्के टॅरिफ लावू. ही एक प्रचंड मोठी रक्कम असेल, ज्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल.