कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 10:08 IST2025-04-29T10:08:15+5:302025-04-29T10:08:27+5:30
कार्नी हे माजी बँकर आहेत. त्यांच्या नेतृत्वात लिबरल पक्षाने हरलेली निवडणूक जिंकली आहे. कंझर्वेटिव्ह पक्षाचे पियरे पोइलिवरे याचा परभव झाला आहे.

कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
कॅनडामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मार्क कार्नी नवे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. कॅनडाच्या लिबरल पक्षाने सलग चौथ्यांदा सरकार बनविण्यात यश मिळविले आहे. काही महिन्यांपूर्वी संपूर्ण जनमत या पक्षाविरोधात होते. परंतू, पक्षाने जस्टीन ट्रुडो यांना राजीनामा द्यायला लावला होता. याचा व ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेत घेण्याच्या वक्तव्याचा परिणाम म्हणून कार्नी यांच्या विजयाकडे पाहिले जात आहे.
कार्नी हे माजी बँकर आहेत. त्यांच्या नेतृत्वात लिबरल पक्षाने हरलेली निवडणूक जिंकली आहे. कंझर्वेटिव्ह पक्षाचे पियरे पोइलिवरे याचा परभव झाला आहे. ट्रम्प यांनी कॅनडाला वेगळा देश नाही तर अमेरिकेत सहभागी करून घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून ते कॅनडाला धमक्याही देत होते. कार्नी यांनी निवडणूक प्रचारात सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांना कडाडून विरोध केला. या आक्रमकतेमुळे कार्नी पंतप्रधान झाले आहेत.
जानेवारीमध्ये ट्रुडो यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्याविरोधात पक्षात तसेच लोकांतही रोष होता. यानंतर कार्नी यांचा उदय झाला होता. त्यांनी लोकांसमोर आपली प्रतिमा संकट मोचक म्हणून ठेवली. कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे, अमेरिकेच्या विस्तारवादापासून वाचविण्याचा तसेच ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरमधून बाहेर काढण्याचा वादा केला होता.
कार्नी यांनी दोन G7 मध्यवर्ती बँकांचे प्रमुखपद भूषवले आहे. तसेच गेल्या दहा वर्षांपासून ते गोल्डमन सॅक्समध्ये देखील काम करत आहेत. याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला आहे. ट्रम्प प्रशासनाने कॅनडावर विविध प्रकारची शुल्क लादले तेव्हा कार्नी यांनी ते या देशाच्या सन्मानाशी जोडले आणि निवडणुकीत त्याचा फायदा घेतला. कार्नी यांनी ट्रम्प यांची निती पाहून ऑक्टोबर २०२५ मध्ये होणार असलेली निवडणूक मार्चमध्येच जाहीर केली. ट्रुडो यांनी राजीनामा दिल्यानंतर कार्नी यांच्याकडेच पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्यात आली होती.