Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:28 IST2025-11-06T15:26:42+5:302025-11-06T15:28:43+5:30
कॅनडा सरकारने पुढील तीन वर्षांसाठीचे आपले व्हिसा नियम खूप कठोर केले आहेत. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका विदेशी विद्यार्थ्यांना बसला आहे.

Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
कॅनडामध्ये जाऊन शिकण्याचे किंवा काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक वाईट बातमी आहे. कॅनडा सरकारने पुढील तीन वर्षांसाठीचे आपले व्हिसा नियम खूप कठोर केले आहेत. कॅनडाने देशात कायम राहणाऱ्या लोकांची संख्या तशीच ठेवली आहे. पण, परदेशातून येणारे विद्यार्थी आणि तात्पुरत्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांवर मोठी बंदी
या निर्णयाचा सर्वात मोठा फटका विदेशी विद्यार्थ्यांना बसला आहे. आता कॅनडाने विद्यार्थी व्हिसाची मर्यादा जवळपास ५०%ने कमी केली आहे. यापूर्वी जेवढ्या मुलांना प्रवेश मिळत होता, त्याऐवजी आता दरवर्षी फक्त १.५० ते १.५५ लाख मुलांनाच शिक्षणासाठी कॅनडामध्ये प्रवेश मिळेल. गेल्या वर्षीपर्यंत कॅनडात १० लाखांहून अधिक विदेशी विद्यार्थी होते. यामुळे तिथे राहण्याची आणि शिक्षणाची समस्या वाढली होती. त्यामुळेच आता सरकारने ही मोठी कपात केली आहे.
भारतीयांना टार्गेट का केले?
कॅनडामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी भारतातून जातात. पण, आता भारतीय विद्यार्थ्यांसाठी परिस्थिती खूप अवघड झाली आहे. आतापर्यंत जेवढे अर्ज येत होते, त्यापैकी ५० टक्के व्हिसा अर्ज आधीच फेटाळले जात होते. आता हा आकडा ८० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. कॅनडा सरकारने सांगितले आहे की, त्यांना भारत आणि बांगलादेशातून हजारो खोटे अॅडमिशन लेटर आणि फसवणूक करणारी कागदपत्रे मिळाली आहेत.
या फसवणुकीमुळेच आता भारतीय विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी खूप कडक केली जाणार आहे. तुमचे बँक बॅलन्स आणि कॉलेजची कागदपत्रे आता खूप बारकाईने तपासली जातील.
कामगारांसाठीही नियम कडक
फक्त विद्यार्थीच नव्हे, तर कामासाठी येणाऱ्या तात्पुरत्या कामगारांची संख्या सुद्धा कमी करण्यात आली आहे. २०२६ मध्ये फक्त २.३० लाख कामगारांनाच परवानगी मिळेल. पुढील दोन वर्षांसाठी ही संख्या २.२० लाख ठेवली आहे. थोडक्यात, कॅनडामध्ये आता शिक्षण आणि कामासाठी जाणे खूपच कठीण होणार आहे. तुमचे कागदपत्रे खरी असतील तरच तुम्हाला संधी मिळू शकते.