'कारागृहात माझी रूम अन् बाथरूममध्ये कॅमेरे लावण्यात आले', मरियम नवाझ यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 16:42 IST2020-11-13T16:41:06+5:302020-11-13T16:42:07+5:30
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मरियम नवाझ यांनी, कारागृहातील असुविधांसंदर्भात भाष्य केले. मरियम यांना गेल्या वर्षी चौधरी शुगर मिल्सप्रकरणी अटक केल्यानंतर कारागृहात पाठवण्यात आले होते. (Maryam Nawaz sharif)

'कारागृहात माझी रूम अन् बाथरूममध्ये कॅमेरे लावण्यात आले', मरियम नवाझ यांचा गंभीर आरोप
इस्लामाबाद -पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी आणि त्यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ (PML-N)च्या उपाध्यक्ष मरियम नवाझ शरीफ यांनी इम्रान सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. यामुळे केवळ इम्रान सरकारच नाही, तर संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. मरियम यांनी आरोप केला आहे, की त्या जेव्हा कारागृहात होत्या, तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी त्यांची रूम आणि बाथरूममध्येही कॅमेरे लावले होते. विशेष म्हणजे मरियम एक खासदारही आहेत.
जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मरियम नवाझ यांनी, कारागृहातील असुविधांसंदर्भात भाष्य केले. मरियम यांना गेल्या वर्षी चौधरी शुगर मिल्सप्रकरणी अटक केल्यानंतर कारागृहात पाठवण्यात आले होते. पाकिस्तानातील इम्रान सरकारवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, "मी दोन वेळा कारागृहात गेले आहे आणि तेथे माझ्या सोबत, एका महिलेसोबत कशा प्रकारे व्यवहार केला गेला, हे मी सांगितले, तर त्यांची चेहरा दाखवण्याचीही हिंमत होणार नाही."
पाकिस्तानातील तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) सरकारवर टीका करताना पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम म्हणाल्या, जर अधिकारी रूम तोडून त्यांचे वडील नवाझ शरीफांसमोर त्यांना अटक करू शकतात आणि त्यांच्यावर वैयक्तीक हल्ले करू शकतात, तर पाकिस्तानात महिला किती सुरक्षित आहेत? याचा अंदाज आपण लावू शकतात. मात्र, महिला पाकिस्तानातील असो अथवा आणखी कुठली, ती कमजोर असू शकत नाही."
जियो न्यूजनुसार, मरियम नवाज म्हणाल्या, की त्यांचा पक्ष संविधानाच्या चौकटीत राहून लष्करी आस्थापनांसह चर्चा करण्यास तयार आहे. मात्र, सत्तेवर असलेल्या पीटीआय सरकारला तत्काळ हटवीले जावे. त्या म्हणाल्या आम्ही आस्थापनांच्या विरोधात नाही. मात्र, या विषयावर कसल्याही प्रकारची गुप्त चर्चा होणार नाही.