CoronaVirus: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 17:27 IST2020-03-27T17:07:52+5:302020-03-27T17:27:23+5:30
Coronavirus व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुढील बैठकांना हजेरी लावणार

CoronaVirus: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण
लंडन: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची बाधा झाली आहे. जॉन्सन यांनीच याबद्दलची माहिती दिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं दिसून येत होती. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत मला कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे मी पुढील काही दिवस मी इतरांपासून दूर राहीन. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाशी संबंधित बैठकींना हजर असेन, असं जॉन्सन यांनी सांगितलं.
United Kingdom Prime Minister Boris Johnson tests positive for #COVID19pic.twitter.com/ZgQj4gV7sz
— ANI (@ANI) March 27, 2020
ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कालपासून कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवू लागली होती, अशी माहिती डाऊनिंग स्ट्रिटच्या प्रवक्त्यांनी दिली. गुरुवारी (काल) जॉन्सन यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात काही प्रश्नांना उत्तरं दिली. यानंतर ब्रिटनचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी ख्रिस विट्टी यांनी त्यांना कोरोनाची चाचणी करुन घेण्याचा सल्ला दिला. या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर जॉन्सन यांनी इतरांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुढील बैठकांना हजर राहणार असल्याची माहिती पंतप्रधान जॉन्सन यांनी दिली. आपण सगळे मिळून कोरोनाचा मुकाबला करू, असंदेखील ते म्हणाले.