ब्रिटनने ट्रम्प यांना दाखवला ठेंगा! युद्धात सामील होणार नाही, 'होर्मुझची सामुद्रधुनी' खुली करण्यासाठी ३५ देशांची बैठक बोलावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:18 IST2026-04-01T17:03:34+5:302026-04-01T17:18:04+5:30
अमेरिका होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी जागतिक होर्मुझ शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. या आठवड्यात ब्रिटनच्या यजमानपदाखाली सुमारे ३५ देशांसोबत एक बैठक आयोजित केली जाईल.

ब्रिटनने ट्रम्प यांना दाखवला ठेंगा! युद्धात सामील होणार नाही, 'होर्मुझची सामुद्रधुनी' खुली करण्यासाठी ३५ देशांची बैठक बोलावली
इराण आणि अमेरिका, इस्त्रायलमध्ये मागील ३३ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. अमेरिका आपल्या अटींवर करार करण्याबाबत बोलत आहे, तर इराण नकार देत आहे. दरम्यान, ब्रिटनने इराण युद्धात सामील होणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे. ब्रिटन इराण युद्धात सामील होणार नाही, असे ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांनी स्पष्ट केले.
अमेरिका होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी जागतिक होर्मुझ शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. या आठवड्यात ब्रिटनच्या यजमानपदाखाली सुमारे ३५ देशांसोबत एक बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यावर चर्चा होईल, असे स्टार्मर म्हणाले.
इराणच्या मदतीसाठी रशिया सरसावला; सीआयएच्या संपर्कात असलेल्या प्रमुखाचा खळबळजनक दावा
इराणसोबतच्या युद्धाचा ब्रिटनच्या भविष्यावर मोठा परिणाम होईल, असा इशारा स्टार्मर यांनी दिला, पण त्याचबरोबर आपला देश या संकटाचा सामना करण्यास पूर्णपणे तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
"माझ्यावर आणि इतरांवर कितीही दबाव असला, कितीही गदारोळ झाला तरी, माझे सर्व निर्णय ब्रिटिश नागरिकांच्या सर्वोत्तम हिताचेच असतील. हे आमचे युद्ध नाही, आम्हाला त्यात ओढले जाण्याची इच्छा नाही," असेही ते म्हणाले.
पश्चिम आशियातील युद्धामुळे संपूर्ण प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान पोहोचू शकते, असे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने म्हटले आहे. हे युद्ध आता फक्त काही देशांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते संपूर्ण प्रदेशासाठी एक मोठे संकट बनले आहे.
ट्रम्प यांचा नाटोतून बाहेर पडण्याचा विचार
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोमधून बाहेर पडण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचे सांगितले आहे. त्यांनी नाटोला 'कागदी वाघ' म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले की, ते नाटोमुळे आधीच फारसे प्रभावित नव्हते आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचीही तीच भावना आहे, असा त्यांचा विश्वास आहे.
इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेला पाठिंबा देण्यास नाटो देशांनी नकार दिल्यानंतर त्यांनी हे विधान केले. अमेरिकेला नाटो देशांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आपली युद्धनौका पाठवावी असे वाटत होते, परंतु त्यांनी नकार दिला.