britain to issue coin in honour of mahatma gandhi | महात्मा गांधींवर ब्रिटन काढणार विशेष नाणे  

महात्मा गांधींवर ब्रिटन काढणार विशेष नाणे  

ठळक मुद्देगांधीजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्रिटन एक विशेष नाणे काढणार आहे.ब्रिटनचे वित्तमंत्री साजीद जाविद यांनी याबाबत माहिती दिली आहे. 'महात्मा गांधी यांची शिकवण ही जगासाठी वंदनीय आहे. ती कधीच विसरली जाऊ नये या उद्देशाने ब्रिटनने हे स्मृतिनाणे काढायचे ठरवले आहे'

लंडन - भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती 2 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर गांधीजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्रिटन एक विशेष नाणे काढणार आहे. ब्रिटनचे वित्तमंत्री साजीद जाविद यांनी याबाबत माहिती दिली आहे. 'महात्मा गांधी यांची शिकवण ही जगासाठी वंदनीय आहे. ती कधीच विसरली जाऊ नये या उद्देशाने ब्रिटनने हे स्मृतिनाणे काढायचे ठरवले आहे' असं जाविद यांनी सांगितलं. 

ब्रिटनमध्ये दक्षिण आशियाई देशांतील अनेक नागरिक राहतात. त्यातील अनेकांनी आता ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले आहे. या समुदायातील प्रभावी व्यक्तींचा सत्कार साजीद यांच्या हस्ते एका समारंभात करण्यात आला. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. ब्रिटनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या दक्षिण आशियाई लोकांपैकी 2019 साठीची प्रभावी व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये प्रीती पटेल यांनी दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. त्या ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री आहेत.

 महात्मा गांधी शालेय शिक्षण संपवून 1888 मध्ये लंडनला वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्यांनी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. ब्रिटनमध्ये ते बॅरिस्टर झाले. त्यानंतर भारतात परत येऊन वकिली करू लागले. 1931 साली गोलमेज परिषदेसाठी ते लंडनला आले होते. गांधींजींवर गेल्या शंभर वर्षांत एक लाखांवर पुस्तके लिहिली गेली व तेवढ्याच पुस्तकात त्यांचे संदर्भ आले आहेत.

गांधीजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचेच केवळ नेते नव्हते. साऱ्या जगात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करणारे व त्यासाठी नि:शस्त्र माणसांना संघटित होण्याचा मार्ग दाखविणारे महापुरुष होते. सामान्य माणूस शस्त्र घेऊन लढू शकत नाही. मात्र त्याची सहनशक्ती मोठी असते. गांधींनी या सहनशक्तीचे संघटन करून त्यातून अहिंसा व सत्याग्रह या दोन नव्या व अभिनव शस्त्रांची निर्मिती केली. गांधीजी केवळ स्वातंत्र्य लढ्याचे नेते नव्हते. सामाजिक उत्थानाचे, दलितांच्या उद्धाराचे, सफाई कामगारांच्या कल्याणाचे, स्त्रियांच्या सबलीकरणाचे, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे, राष्ट्रीय एकात्मतेचे व साऱ्या जगात मनुष्यधर्माचा स्वीकार होऊन जगाचे ऐक्य घडून यावे यासाठी होणाऱ्या प्रयत्नांचे व प्रवाहांचे ते नेते होते.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: britain to issue coin in honour of mahatma gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.