वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:00 IST2025-12-16T16:37:38+5:302025-12-16T17:00:09+5:30
Bondi Beach Shooting: ऑस्ट्रेलियातील बाँडी बिच येथे रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवाद्यांनी ज्यू धर्मियांना लक्ष्य करत हा हल्ला केल्याचं प्राथमिक तपासामधून समोर येत आहे. तसेच आपल्या प्राणांची पर्वा न करता दहशतवाद्यांशी लढणाऱ्या काही शूर नागरिकांच्या कहाण्याही समोर येत आहेत.

वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
ऑस्ट्रेलियातील बाँडी बिच येथे रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवाद्यांनी ज्यू धर्मियांना लक्ष्य करत हा हल्ला केल्याचं प्राथमिक तपासामधून समोर येत आहे. तसेच आपल्या प्राणांची पर्वा न करता दहशतवाद्यांशी लढणाऱ्या काही शूर नागरिकांच्या कहाण्याही समोर येत आहेत. सोफिया आणि बोरिस, रुवेन मॉरिसन, अहमद अल अहमद यांसारख्या शुरांनी छातीची ढाल करत गोळ्या झेलून हा हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला. सोफिया आणि बोरिस हे जोडपंही अशाच धैर्यवानांपैकी एक होतं. त्यांनी बाँडी बिचवर दहशत निर्माण करणारा दहशतवादी साजिद याच्या हातातून बंदूक हिसकावली. मात्र या झटापटीदरम्यान, दहशतवाद्याने केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बोरिस आणि सोफिया यांनी एकमेकांच्या मिठीत प्राण सोडले.
रविवार १४ डिसेंबर रोजी दुपारी बोरिस आणि सोफिया हे कँपबेल परेडवेळी फिरत होते. तेवढ्यात दहशतादी साजिद अक्रम हा आपल्या कारमधून आयएसच्या झेंड्या आडून समोर आला. तिथून जात असलेल्या दुचाकीस्वाराच्या कॅमेऱ्यामध्ये हे संपूर्ण दृश्य चित्रित झालेलं आहे. काहीतरी अघटित घडतंय, असा संशय ६९ वर्षीय बोरिस यांना आला. त्यानीं वेळ न दवडता साजिद अक्रम याला धक्का देत खाली पाडलं. तसेच साजिद अक्रम याच्या हातामधील रायफल हिसकावून घेतली.
आजूबाजूच्या लोकांना नेमकं काय घडतंय याची कल्पना आली. तसेच लोक आजूबाजूला लपू लागले. याचदरम्यान, बोरिस यांनी अक्रमकडील रायफल हिसकावून घेतली आणि त्याच्यावरच रोखली. बोरिस यांनी अक्रमला काही काळ नियंत्रणात आणलं. बोरिस यांची पत्नी सोफिया ही देखील बोरिसवर तुटून पडली. मात्र याचदरम्यान, दहशतवादी अक्रम याने संधी साधून बोरिस यांच्यावर हल्ला केला. तसेच आपल्याकडील दुसरी रायफल उचलली. त्यानंतर अक्रम याने बोरिस आणि सोफिया यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या.
हे संपूर्ण चित्रण अन्य एका व्हिडीओमध्ये चित्रित झालं आहे. रायफल उचलल्यानंतर अक्रम याने बोरिस आणि सोफिया यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे. तसेच हा गोळीबार एवढा भयंकर होता की, त्यात बोरिस आणि सोफिया यांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांना मिठीत घेत दोघांनीही जगाचा निरोप घेतला. कदाचित दोघांनीही एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान, झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
बोरिस आणि सोफिया यांच्या विवाहाला ३४ वर्षे झाली होती. तसेच या दोघांनीही एकमेकांच्या मिठीतह अखेरचा श्वास घेतला. बोरिस आणि सोफिया यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.