जगात पहिल्यांदाच! ‘Be My Eyes’ स्मार्ट ग्लासेस वापरून दृष्टिहीन व्यक्तीची मॅरेथॉन पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 16:28 IST2026-04-15T16:26:51+5:302026-04-15T16:28:50+5:30
धावण्यादरम्यान त्यांना 'बी माय आइज' अॅपद्वारे मार्गदर्शन मिळालं. अशाप्रकारे ही इतिहासातील पहिली आणि मोठी घटना आहे.

जगात पहिल्यांदाच! ‘Be My Eyes’ स्मार्ट ग्लासेस वापरून दृष्टिहीन व्यक्तीची मॅरेथॉन पूर्ण
४५ वर्षीय दृष्टिहीन धावक क्लार्क रेनॉल्ड्स जे मिस्टर डॉट नावानेही प्रसिद्ध आहेत, यांनी १२ एप्रिल रोजी ब्रायटन मॅरेथॉनमध्ये स्मार्ट चष्म्याचा वापर करून सहभाग नोंदवत मॅरेथॉन पूर्ण केली. जगातील ही अशी पहिलीच घटना आहे. रेटिनायटिस पिगमेंटोसामुळे केवळ पाच टक्के दृष्टीने पीडित रेनॉल्ड्स मेटा एआय चष्म्याच्या मदतीने २६.२ मैल धावले. धावण्यादरम्यान त्यांना 'बी माय आइज' अॅपद्वारे मार्गदर्शन मिळालं. अशाप्रकारे ही इतिहासातील पहिली आणि मोठी घटना आहे.
बी माय आइज' हा प्लॅटफॉर्म साधारणपणे वापरकर्त्यांना अनोळखी स्वयंसेवकांशी जोडतो, मेटा एआय ग्लासेसवरील ‘Be My Eyes Groups’ या नव्या फीचरमुळे रेनॉल्ड्स यांना स्वतःचा खासगी स्वयंसेवकांचा गट तयार करावा लागला. त्यांच्या मॅरेथॉनसाठी या स्वयंसेवकांची आधीच निवड करण्यात आली होती आणि प्रशिक्षणही दिलं गेलं होतं.
रेनॉल्ड यांनी ४२.२ किमीची मॅरेथॉन सुमारे ६ तास २० मिनिटांत पूर्ण केली. हे एक अशाप्रकारचं जगातील पहिलं उदाहरण मानलं जातं. तंत्रज्ञानामुळे दृष्टिहीन लोक काय करू शकतात याचं मोठं उदाहरण ठरलं. त्यांनी “Fight for Sight” या संस्थेसाठी निधीही उभारला आहे.
क्लार्क यांनी याआधी गाईडसोबत लंडन मॅरेथॉन पूर्ण केली होती. आता या अॅपच्या माध्यमातून त्यांना आधीच १०० हून अधिक स्वयंसेवकांचा पाठिंबा मिळाला होता. स्वयंसेवकांव्यतिरिक्त, रिचर्ड व्हायटहेड फाउंडेशन त्यांच्या Supported Runner Project अंतर्गत क्लार्क यांना अतिरिक्त सुरक्षेसाठी प्रशिक्षित गाईड रनरही उपलब्ध करून दिला गेला होता.