Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:19 IST2025-11-07T16:18:27+5:302025-11-07T16:19:44+5:30
Indonesia Jakarta Mosque Blast: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे नमाज वेळी अचानक स्फोट झाला, यात ५० हून अधिक जण जखमी झाले.

Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील केलापा गडिंग परिसरात आज (शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५) सकाळी स्टेट सीनियर हायस्कूल ७२ येथील मशिदीत स्फोटाची घटना घडली. नमाज पठण सुरू असताना झालेल्या या स्फोटात ५० हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही शाळा नौदलाच्या कंपाऊंडमध्ये असल्याने नौदलाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसराला वेढा घातला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीच्या मुख्य हॉलच्या मागच्या बाजूने अचानक मोठा आवाज आला आणि परिसरात धुराचे लोट पसरले. स्फोटामुळे घाबरलेली मुले रडत आणि ओरडत बाहेर धावली. धावपळीत काही जण पडल्यामुळे जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या केलापा गडिंग क्लिनिकमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. प्राथमिक तपासानुसार, जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
🇮🇩 - Dozens were injured when an explosion occurred in a crowded Jakarta mosque during Friday prayers. Police say at least 54 people were hurt by the shockwave, flying debris and burns, with 20 needing hospital treatment. A witness recounted a loud bang just as the sermon began,… pic.twitter.com/B0CXwycLaU
— EuroWatcher - News for you (@EuroWatcherEUW) November 7, 2025
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्फोटानंतर लगेचच नौदलाचे कर्मचारी आणि जकार्ता पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली. बॉम्ब शोध पथकाने मशीद आणि आजूबाजूच्या भागाची कसून तपासणी केली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. यामध्ये रिमोट कंट्रोल, एअरसॉफ्ट गन आणि रिव्हॉल्व्हर प्रकारचे शस्त्र यांचा समावेश आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, स्फोटाचा तपास सध्या सुरू आहे. फॉरेन्सिक आणि बॉम्ब निकामी करणारे तज्ज्ञ सापडलेल्या सर्व संशयास्पद वस्तूंची तपासणी करत आहेत. या क्षणी कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. सध्या शाळा बंद करण्यात आली असून, परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलीस लवकरच या घटनेचा संपूर्ण तपास अहवाल प्रसिद्ध करतील.