अफगाणिस्तान हवाई दलाची ७ हेलिकॉप्टर्स चोरीला, कुणी दिली तालिबानच्या हातात तुरी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 08:26 IST2025-02-10T08:26:15+5:302025-02-10T08:26:54+5:30

Black Hawk Helicopter: मागच्या साडे तीन वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानला मोठा धक्का देणारी घटना घडली आहे. तालिबानच्या ताब्यात असलेली सात ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स चोरीला गेली आहेत.

Black Hawk Helicopter: 7 Afghan Air Force helicopters stolen, who gave them to the Taliban? | अफगाणिस्तान हवाई दलाची ७ हेलिकॉप्टर्स चोरीला, कुणी दिली तालिबानच्या हातात तुरी? 

अफगाणिस्तान हवाई दलाची ७ हेलिकॉप्टर्स चोरीला, कुणी दिली तालिबानच्या हातात तुरी? 

मागच्या साडे तीन वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानला मोठा धक्का देणारी घटना घडली आहे. तालिबानच्या ताब्यात असलेली सात ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स चोरीला गेली आहेत. यूएच-६०ए ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स उझबेकिस्तानने अमेरिकेच्या ताब्यात दिली आहेत. ही हेलिकॉप्टर्स अफगाणिस्तान हवाई दलाच्या ताफ्यात होती. मात्र आता ही हेलिकॉप्टर्स हातातून निसटल्याने तालिबानचा संकाप अनावर झाला आहे. तसेच तालिबानने उझबेकिस्तान आणि अमेरिकेला धमकी दिली आहे. ही हेलिकॉप्टर्स अफगाणिस्तानची मालमत्ता असल्याने ती आपल्याला परत मिळावीत, अशी मागणी तालिबानने केली आहे.

जवळपास २० वर्षे नियंत्रण ठेवल्यावर २०२१ मध्ये अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला होता. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानने सत्ता प्रस्थापित केली होती. तसेच अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या पाठिंब्याने स्थापन सरकार कोसळले होते. हे सरकार कोसळल्यानंतर पायलटांनी देशातून पलायन करण्यासाठी या हेलिकॉप्टर्सचा वापर केला होता. तेव्हापासून हे हेलिकॉप्टर्स उझबेकिस्तानमध्येच होते.

यूएच-६०ए ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर्स हे अनेक युद्धांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे हेलिकॉप्टर्स आहेत. त्यांचा वापर हा आखाती युद्ध, सोमाली युद्ध आणि अफगाणिस्तान युद्धामध्ये करण्यात आला होता. या हेलिकॉप्टर्सची मजबूत रचना आणि अनुकूल क्षमतेमुळे जगभरातील लष्करांकडून या हेलिकॉप्टर्सना मागणी आहे.

या सात हेलिकॉप्टर्सचं हस्तांतरण मध्य आशियातील बदलत्या भूराजकीय परिस्थितीचं एक उदाहरण आहे. आता या हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून अमेरिका आपला या भागातील लष्करी ताफा अधिकच भक्कम करण्यास सक्षम होणार आहे. मात्र तालिबानच्या नेतृत्वातील अफगाणी संरक्षण मंत्रालयाने या हेलिकॉप्टर्सच्या हस्तांतरणावरून नाराजी व्यक्त केली आहे. तालिबानने याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, इस्लामिक अमिरात याबाबत चिंतीत आहे. कारण ही विमानं अफगाणिस्तानची आहेत. तसेच मागच्या प्रशासनाने पळून जाताना ती उझबेकिस्तान येथे नेली होती. कुठल्याही कारणाने त्यांचं अमेरिकेकडे हस्तांतरण अस्वीकार करतो, असे तालिबानने म्हटले आहे. 
दरम्यान, २०२१ साली ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने पूर्णपणे माघार घेतली होती. जेव्हा अमेरिकन लष्कर माघारी परतत होतं, तेव्हा त्यांना आपल्याकडील हत्यारे आणि वाहने अफगाणिस्तानमध्येच सोडली होती. त्यापैकी बहुतांश हत्यारे ही तालिबानच्या हाती लागली होती.  

Web Title: Black Hawk Helicopter: 7 Afghan Air Force helicopters stolen, who gave them to the Taliban?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.