Bilawal Bhutto Said Earlier We Talk About Taking Kashmir, Now Difficult Save Muzaffarabad | Video: 'आम्ही काश्मीर घेण्याची भाषा करत होतो, मात्र आज मुजफ्फराबाद वाचविणेही कठीण झालं'

Video: 'आम्ही काश्मीर घेण्याची भाषा करत होतो, मात्र आज मुजफ्फराबाद वाचविणेही कठीण झालं'

इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असताना पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात पाकमधील विरोधी नेत्यांनी आघाडी उघडली आहे. पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण प्रत्येक स्तरावर अपयशी ठरल्याची टीका करत पाकमधील पीपुल्स पार्टीचे चेअरमन बिलावल भुट्टो यांनी केली आहे. 

पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना बिलावल भुट्टोंनी सांगितले की, पाकिस्तानात इम्रान खान सत्तेत येण्यापूर्वी आम्ही भारताला धमकी देत होतो की, आम्ही काश्मीर घेऊनच गप्प बसणार आहोत. मात्र इम्रान खान सत्तेत आल्यानंतर परराष्ट्र धोरणाची ऐशीतैशी झाली. आम्ही श्रीनगर घेण्याची भाषा करत होतो. काश्मीर घेण्याची भाषा करत होतो मात्र आज अशी परिस्थिती आली आहे की, आम्हाला पाकव्याप्त काश्मीर, मुजफ्फाराबाद वाचविणेही कठीण झालं आहे. या परिस्थिती कारणीभूत आत्ताचं इम्रान खान सरकार आहे. 

तसेच पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत:च्या फायद्यासाठी सत्तेचा वापर केला. इम्रान खान यांना जनतेने नाही तर नियुक्त केलेले पंतप्रधान आहेत. त्यांना पाकिस्तानी जनतेला उत्तर द्यावे लागणार आहे असा टोलाही बिलावल भुट्टोने लगावला आहे. 

इस्लामाबाद येथे पीपीपी पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर बिलावल भुट्टो यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आजपर्यंत पाकिस्तानमधील कोणतंही सरकार इतकं अपयशी झालं नाही त्यापेक्षा अपयश इम्रान खान यांच्या नाकर्तेपणामुळे आलं आहे. आपल्या लोकशाहीची खेळ सुरू आहे. देशाची अर्थव्यवस्थाही बिघडून टाकली आहे. तुम्ही पण झोपा काढा, विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठीच तुम्ही जागे व्हा अशी टीका भुट्टोने केली आहे. 

तुमच्या अशाप्रकारे झोपा काढण्याने नरेंद्र मोदींनी काश्मीरवर कब्जा केला. पूर्वी पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण काय होतं? आम्ही श्रीनगर घेण्यासाठी प्लॅन बनवित होतो. मात्र इम्रान खान यांनी अशी परिस्थिती बनविली आहे की, आता आम्हाला विचार करावा लागत आहे की, भारतापासून मुजफ्फाराबाद कसं वाचविले जाईल अशी जोरदार टीका बिलावल भुट्टोने पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर केली आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bilawal Bhutto Said Earlier We Talk About Taking Kashmir, Now Difficult Save Muzaffarabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.