तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 18:15 IST2025-05-12T18:12:09+5:302025-05-12T18:15:26+5:30

स्वतंत्र प्रदेशाची मागणी करणाऱ्या तुर्कीतील कुर्दीश बंडखोर गटाने शस्त्रे टाकण्याची घोषणा केली आहे.

Big victory for Turkish government, 40-year conflict finally ends; Kurdish rebels surrender | तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

Turkey Kurdish Group: तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. स्वातंत्र प्रदेशाची मागणी करणाऱ्या कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (पीकेके) ने तुर्की सरकारविरुद्ध 40 वर्षांपासून सुरू असलेला लढा थांबवून शस्त्रे टाकण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपली स्वातंत्र प्रदेशाची मागणीही मागे घेतली असून, तुर्कीमध्ये सामील होण्यास होकार दिला आहे.

सोमवारी पीकेकेच्या आत्मसमर्पणाचे वृत्त फिरात न्यूज एजन्सीने दिले. पीकेकेने त्यांचे नेते अब्दुल्ला ओकलन याच्या आवाहनावरुन स्वतःला तुर्कीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. ओकलनवर देशद्रोह आणि फुटीरतावाद पसरवण्याचा आरोप असून, तो सध्या तुरुंगात आहे. फेब्रुवारीमध्येच त्याने पीकेकेला शस्त्रे टाकून गट विसर्जित करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, पीकेकेवर तुर्की, युरोपियन युनियन, ब्रिटन आणि अमेरिकेने दहशतवादी गट म्हणून बंदी घातली आहे. 

तुर्कीच्या एकूण लोकसंख्येच्या 20 टक्के लोक कुर्द आहेत. पीकेकेच्या बंडाचा उद्देश सुरुवातीला कुर्दांसाठी स्वतंत्र देशाची मागणी करणे होता, परंतु नंतर हा गट ध्येयांपासून दूर गेला आणि त्याऐवजी कुर्दांसाठी स्वायत्त प्रदेशाची मागणी करू लागला. तुर्की सरकार आणि पीकेके यांच्यातील लढाईत आतापर्यंत 40 हजाराहून अधिक लोक मारले गेले आहेत. यातील बहुतांश पीकेकेचे सैनिक होते. शस्त्रास्त्रे टाकण्याची घोषणा करताना, पीकेकेने म्हटले की, आम्ही आमचे ऐतिहासिक ध्येय पूर्ण केले आहे. आता आमचा सशस्त्र संघर्ष संपला असून, यापुढे कुर्दिश समस्या लोकशाही मार्गाने सोडवल्या जातील.

पीकेकेचा इतिहास काय आहे?
पीकेके ही एक दहशतवादी संघटना आहे, जी 1978 मध्ये आग्नेय तुर्कीमध्ये अब्दुल्ला ओकलन यांनी स्थापन केली होती. या गटाची विचारसरणी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारांवर आधारित आहे. स्वतंत्र कुर्दिस्तान निर्माण करण्याच्या उद्देशाने पीकेकेने 1984 मध्ये तुर्कीविरुद्ध बंड सुरू केले. परंतु नंतर या गटाने वेगळ्या देशाची मागणी सोडून दिली आणि आग्नेय तुर्कीयेमध्ये कुर्दांसाठी स्वायत्त प्रदेशाची मागणी करण्यास सुरुवात केली.

पीकेके 1998 पर्यंत सीरियातून कार्यरत होते, परंतु तुर्कीच्या वाढत्या दबावामुळे गटाचा नेता ओकलनला सीरियातून पळून जावे लागले. काही महिन्यांनंतर तुर्कीच्या विशेष सैन्याने केनियामधून ओकलनला ताब्यात घेतले. 1999 मध्ये तुर्कीच्या न्यायालयाने ओल्कानला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती, पण ऑक्टोबर 2002 मध्ये ओकलनची मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.

ओकलनच्या तुरुंगवासानंतरही पीकेकेचा बंड सुरूच होता. अनेक दशकांच्या हिंसाचारानंतर 2012 मध्ये तुर्की सरकार आणि पीकेके वाटाघाटीच्या टेबलावर आले. परंतु जुलै 2015 मध्ये ही चर्चा तुटली आणि तुर्कीयेमध्ये पुन्हा कुर्दिश हिंसाचार सुरू झाला. पण हळूहळू लढाई कमकुवत होत गेली. ऑक्टोबर 2024 मध्ये राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांचे राजकीय सहयोगी देवलेट बहसेली यांनी पीकेकेला आवाहन केले की, त्यांनी आपले आंदोलन थांबवले, तर ओकलनची सुटका केली जाईल. यानंतर आता संघटनेने शस्त्रे खाली ठेवली आहेत. 

Web Title: Big victory for Turkish government, 40-year conflict finally ends; Kurdish rebels surrender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.